रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथील प्रस्तावित तेल शुद्धीकरणाचा कारखाना रद्द झाल्यानंतर आता नवीन जागेबाबत राज्य सरकार आणि शिवसेना सकारात्मक असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. राजापूर तालुक्यातील बारसू-धोपेश्वर-गोवळ या ठिकाणच्या जागेबाबत केंद्र आणि राज्य सरकारच्या सचिव स्तरावर चर्चा सुरु असून त्या सकारात्मक असल्याची विश्वसनीय माहिती आता समोर येत आहे. नवीन जागेच्या ठिकाणी एमआयडीसी प्रस्तावित असून आता तिच जागा रिफायनरीसाठी वापरण्याबाबच हालचाली सुरु झाल्या आहेत. 


दरम्यान, अखिल भारतीय भंडारी महासंघ आणि काही रिफायनरी समर्थक करणाऱ्या संस्था यांनी काही दिवसांपूर्वी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी रिफायनरीच्या जागा पाहणीकरता केंद्राचं पथक येणार असून मी देखील लवकरच दौरा करेन अशी माहिती दिली होती. त्यामुळे कोकणातील प्रस्तावित तेल शुद्धीकरणाच्या कारखान्याबाबत हालचाली वेगाने सुरु असल्याचं स्पष्ट होत आहे. 


मुख्य बाब म्हणजे केंद्र सरकारच्या एजन्सीकडून प्रोजेक्ट फिजिबिलिटी स्टडी रिपोर्ट तयार करण्यासाठी देखील राज्य सरकारने सकारात्मकता दाखवल्याची माहिती देखील मिळत आहे. त्यामुळे रिफायनरीचा कोकणातील मार्ग मोकळा झाल्याचं देखील बोललं जात आहे. 


दरम्यान, कोकणातील प्रस्तावित तेलशुद्धीकरणाचा प्रकल्प विरोधामुळे अडकून पडला आहे. नाणार ग्रीन रिफायनरी हा पेट्रोलियमचा प्रकल्प असल्यामुळे स्थानिकांचा विरोध आहे. हा प्रकल्प आल्यास आल्यास कोकणातील आंब्याच्या बागांवर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त करत रिफायनरीचा विरोध केला होता. अखेर स्थानिकांचा विरोध पाहता 2019 मध्ये शिवसेनेने प्रकल्प रद्द करत असल्याची घोषणा केली होती.