Maharashtra Government Formation : उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केलेले भाषण हे केवळ भावनिक होते. पण, भावनेच्या पलिकडे विकास असतो असे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटले. आम्ही अजूनही शिवसेनेत असून विधीमंडळ पक्ष आमचा असल्याचा दावा त्यांनी केला. या गटात न आलेल्या 16 आमदारांना अपात्रतेचा सामना करावा लागू शकतो असा इशाराही केसरकरांनी दिला. 


एकनाथ शिंदे गटाकडून भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असताना दुसरीकडे शिंदे गटाने आज आपली भूमिका स्पष्ट केली. गोव्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दीपक केसरकर यांनी म्हटले की, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर सेलिब्रेशन झाले नाही. त्यांनी दिलेल्या राजीनाम्याचे वाईट वाटत आहे. आमची भूमिका शेवटपर्यंत समजून न घेतल्याने ही वेळ आली असल्याचे केसरकरांनी म्हटले. आमच्या मागण्यांकडे लक्ष न दिल्याचा हा परिणाम आहे, असे त्यांनी सांगितले. मागील काही दिवसांपासून  आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न झाला आहे. विविध प्रतिक्रिया देत संभ्रमाची स्थिती निर्माण करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. 


दीपक केसरकर यांनी आजच्या पत्रकार परिषदेत शिवसेनेतील बंडाळीचे समर्थन करताना भाजपसोबतच्या युतीचे जोरदार समर्थन केले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेना संपवण्याचे प्रयत्न सुरू होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात येऊन त्यांच्या पक्षाच्या संभाव्य उमेदवाराच्या नावाची घोषणा करायचे. खासदारांच्याबाबतही असेच अनुभव आहेत. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेसने पाडले. संजय राऊत यांनी त्याबाबत स्पष्टपणे म्हटले होते. उद्धव ठाकरे यांनी याचा जाब विचारायला हवा होता. मात्र, त्यांनी तसा तो केला नसल्याचे केसरकर यांनी म्हटले. 


महाराष्ट्राच्या विकासासाठी निर्णय


आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी म्हटले.  कोणीही मंत्रिपदाच्या आशेने इथं आले नसल्याचे केसरकर यांनी सांगितले. जे काही करायचं आहे ते महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेण्याचे अधिकार एकनाथ शिंदे यांना या बैठकीत देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. 


ठाकरे कुटुंबाला विरोध नाही


आमचा उद्धव ठाकरे अथवा ठाकरे कुटुंबाला विरोध नसल्याचेही केसरकर यांनी म्हटले. आमचा विधिमंडळ पक्ष आहे. आम्हाला 55 आमदारांचा पाठिंबा आहे. एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून काढण्याचा प्रयत्न केला. चर्चा करण्याआधीच त्यांना पदावरून काढण्यात आले. दोन दिवसांपूर्वी देखील आम्ही साद घातली पण उद्धव ठाकरे यांनी ऐकले नाही. उद्धव ठाकरे यांना प्रत्येक आमदाराबाबत आदर असल्याचे त्यांनी म्हटले.


संजय राऊत जेवढे कमी बोलतील तेवढे चांगलं  


संजय राऊत यांनी आता शांत बसावे असेही दीपक केसरकर यांनी म्हटले. केंद्र सरकारविरोधात वक्तव्ये करून राज्य आणि केंद्रात त्यांनी वाद लावला. त्यातून काहीच साध्य झाले नाही. त्याचा परिणाम विकासावर झाला असल्याचे केसरकर यांनी म्हटले. संजय राऊत यानी भडकावू भाषण करून नागरिक रस्त्यावर येतील याचा प्रयत्न केला असल्याचेही केसरकर यांनी म्हटले. उद्धव ठाकरे यांच्या बद्दल कुणी बोललं तर ते भाजपचे मत मानलं जायचं, पण खरं तर ते भाजपचे मत नसायचे ते त्या नेत्याचे मत असायचे असेही केसरकरांनी म्हटले. संजय राऊत जेवढे कमी बोलतील तेवढे चांगलं आहे असेही केसरकर यांनी म्हटले