अहमदनगर : राज्यात ऑक्सिजनची आणीबाणी अद्याप सुरुच आहे. ऑक्सिजनअभावी अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ऑक्सिजन मिळेपर्यंत रुग्णाच्या नातेवाईकांचे प्राण अगदी कंठाशी येत आहेत. असाच प्रकार पिंपरी चिंचवड आणि अमदनगरमध्ये पाहायला मिळाला. अहमदनगरमध्ये ऑक्सिजन तुटवड्यामुळे काल रात्री आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. रात्री उशीरा ऑक्सिजनचा टँकर नगरमध्ये दाखल झाल्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांचा जीव भांड्यात पडला आहे.  याबाबत बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. 


ऑक्सिजन वाटप प्रकरणात सरकारच नियोजन नसून मंजूर कोटासुद्धा नाकारून अन्य जिल्ह्यांकडे वळवला जात असल्याचा आरोप भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय. सुदैवानं रात्री उशीरा ऑक्सिजन पोहोचला आणि नगरमधील शेकडो रुग्णांचा जीव वाचल्याचंही राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांना स्वतः फोन करून हस्तक्षेप केल्या नंतर नगर जिल्ह्याला उणे जिल्ह्यात अडवलेले टँकर मिळू शकले अस स्पष्ट केलं आहे. तसेच काल अहमदनगर जिल्ह्यात काही तास पुरेल एवढाच साठा शिल्लक असताना हा प्रकार घडला. वेळीच हस्तक्षेप झाला नसता तर अनेकांचे प्राण धोक्यात आले असते, असंही ते म्हणाले.


पाहा व्हिडीओ : ऑक्सिजन वाटपात राजकारण नको, सरकारचं पाठपुरवठ्याबाबत योग्य नियोजन नाही : राधाकृष्ण विखे 



यासंदर्भात बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं की, "ऑक्सिजन पुरवठा बाबतीत कोणतंच नियोजन सरकार पातळीवर दिसत नव्हतं. जो मंजूर कोटा रुग्णालयांना दिला होता, तोही नाकारून इतर जिल्ह्यांना वळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. ऑक्सिजन अभावी रुग्ण अत्यवस्थ आहेत. याबाबत मुख्यमंत्र्यांशी रात्री बोलावं लागलं. जो मंजूर कोटा आहे तो तरी आम्हाला मिळू द्या, अशी विनंती केली. त्यानंतर टँकर नगर कडे रवाना झाले. मात्र मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतरही नगरकडे येणारे टँकर पुणे जिल्ह्यात रांजणगावजवळ जिल्हाधिकाऱ्यांनी अडवून ठेवल्याचं समोर आलं. त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्यानंतर हे टँकर नगरकडे रवाना झाले. जर मंजूर कोटा मिळत नसेल तर नागरिकांच्या जिवाच काय?"


"सगळे मंत्री केवळ टीव्ही समोर येऊन बोलत आहेत. बोलबच्चन सारखं बोलत आहेत. महाराष्ट्राच्या दृष्टीने हे मोठं दुःख आणि दुर्दैव आहे की, हे महाविकास आघाडी म्हणतात पण हे महाभकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांमध्ये महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काहीच सोयरसुतक राहिलं नाही. याचं उत्तम उदाहरण परवा आपल्याला रेमडेसिवीर इंजेक्शनच्या बाबतीत पाहायला मिळालं. मला असं वाटतं की, यांना गांभीर्य नाहीये, जबाबदारी घ्यायची नाहीये. महाराष्ट्राची जनता वाऱ्यावर आहे. अशा बेताल लोकांच्या हातात राज्य गेल्याचे परिणाम जनता भोगत आहे.", असं विखे पाटील म्हणाले.