गोवा : ज्येष्ठ साहित्यिक, रहस्यकादंबरीकार व पत्रकार गुरुनाथ नाईक यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी महाराष्ट्र सरकारच्यावतीने ७५ हजार रुपयांचा धनादेश आज नाईक यांना प्रदान करण्यात आला. शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण विश्वस्त निधीतून ही मदत देण्यात आली आहे. राज्य सरकारच्यावतीने कोल्हापूरचे माहिती उपसंचालक सतीश लळीत यांनी हा धनादेश नाईक यांच्याकडे सुपूर्द केला.
रहस्यकथांचा बादशहा म्हणुन प्रसिद्ध असलेले नाईक यांनी दीर्घकाळ पत्रकारिताही केली आहे. गेली काही वर्षे ते गोव्यात स्थायिक झाले आहेत. अलिकडे वयोमानानुसार त्यांची प्रकृती बिघडली असून सध्या ते पणजी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृती अस्वस्थ्याबद्दल माहिती मिळाल्यावर माहिती व जनसंपर्क महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी त्याची दखल घेऊन नाईक यांच्या औषधोपाचारासाठी पत्रकार कल्याण विश्वस्त निधीमधुन मदत देण्याचे आदेश दिले.
माहिती संचालक (प्रशासन) अजय अंबेकर, माहिती संचालक (वृत्त-जनसंपर्क) शिवाजी मानकर यांनी याबाबतची कार्यवाही तातडीने करुन पत्रकार कल्याण विश्वस्त निधीमधून मदत देण्याची कार्यवाही केली.
आज लळीत यांनी पणजी येथील इस्पितळात नाईक यांची भेट घेतली व त्यांना धनादेश सुपूर्द केला. नाईक यांच्या प्रकृतीमध्ये लवकरच सुधारणा होऊन त्यांनी पूर्ववत साहित्यसेवा सुरु करावी, यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. नाईक यांनी मदतीबद्दल महाराष्ट्र सरकारचे आभार मानले.