मुंबई : राज्यात सांगली, कोल्हापूर साताऱ्याला महापुराचा मोठा फटका बसला आहे. कोल्हापूर आणि सांगलीमध्ये अजूनही पाणी ओसरलेले नाही. लोक अजून ही मदत केंद्रांमध्ये आहेत. पुराचं पाणी ओसरल्यानंतर घरात उरलेला चिखल, पाण्यासोबत वाहून आलेली घाण साफ करण्याचं सर्वांपुढे मोठं आव्हान असणार आहे.
सांगली, कोल्हापूरमधील पूरग्रस्तांना मदतीसाठी आता युवा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पुढे सरसावले आहेत. राष्ट्रवादीच्या वतीने पूरग्रस्त गावात स्वच्छता अभियानास सुरुवात झाली असून युवा काँग्रेसचे कार्यकर्ते 15 ऑगस्टपासून गावांमध्ये साफसफाई करण्याचे अभियान हाती घेणार आहेत.
राज्यातील चार हजार युवा कार्यकर्ते स्वच्छता मोहिमेत सहभागी होणार असल्याची माहिती युवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संत्यजित तांबे यांनी दिली. तर युवा काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब यांनी आजपासून स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली असून लोकांचे संसार उभे करायला आम्ही मदत करणार असल्याचं सांगितल.
पूरग्रस्त भागातील पाणी कमी झाल्यावर लोक घरात परततील, तेव्हा त्यांच्यापुढे त्यांची तुटलेली घर, गाळ, चिखल ह्यात पुन्हा आपलं संसार उभे करण्याचं आव्हान असणार आहे. यामध्ये जितक्या जास्त लोकांची मदत होईल तितका पूरग्रस्तांना दिलासा मिळणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.