Maharashtra Din 2025 : 1 मे रोजी महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांची स्थापना झाली होती. संपूर्ण राज्यभरात 'महाराष्ट्र दिन' (Maharashtra Din) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने उत्तर भारतीय संघातर्फे आयोजित कार्यक्रमात प्रशिक्षित गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
कार्यक्रमाची सुरुवात आयोजक आणि उत्तर भारतीय नेत्यांनी मराठीतून भाषण करून केली. उत्तर भारतीय संघाचे अध्यक्ष संतोष आर. एन. सिंह म्हणाले, “आमचा उद्देश केवळ मदत करणे नाही, तर सन्मानपूर्वक स्वावलंबन निर्माण करणे हा आहे. हा कार्यक्रम दाखवतो की, उत्तर भारतीय समाज महाराष्ट्राला केवळ रोजगाराचे साधन नाही, तर स्वतःची कर्मभूमी मानतो.”
या प्रसंगी वरिष्ठ भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांनी नाव न घेता मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, “हिंदी माझी आई, मराठी माझी मावशी. म्हणजे हिंदी आमची आई आहे आणि मराठी आमची मावशी आहे. काही लोक निवडणुका जवळ आल्या की मराठी आणि गैर-मराठी यांच्यात फूट पाडायचा प्रयत्न करतात. जेव्हा त्यांना आपली राजकीय जमीन सरकताना दिसते, तेव्हा ते भाषेचा मुद्दा उचलतात.” कृपाशंकर सिंह यांनी असेही सांगितले की, “जे लोक मराठी अस्मितेची भाषा करतात, त्यांच्या स्वतःच्या मुलांचे शिक्षण मराठीत नाही तर इंग्रजी माध्यमातून होते.” त्यांनी उत्तर भारतीय समाजाला महाराष्ट्राच्या विकासाचा ‘समान भागीदार’ म्हणत म्हटले की, “हा समाज फक्त मजूर नाही, तर महाराष्ट्राच्या प्रगतीत समर्पित नागरिक देखील आहे.”
बीएमसी निवडणुकीच्या तोंडावर मराठी-गैर मराठी भाषा वादाच्या पार्श्वभूमीवर उत्तर भारतीय संघाचा हा कार्यक्रम राजकीयदृष्ट्या देखील महत्त्वाचा मानला जात आहे.
- नम्रता दुबे