Nanded Deglur Biloli By Election Results :  भाजप आणि महाविकास आघाडीने प्रतिष्ठेची केलेली देगलूर पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. मतमोजणीच्या सहाव्या फेरीअखेर काँग्रेसचे जितेश अंतापूरकर यांनी आघाडी घेतली आहे. तर, भाजप उमेदवार सुभाष साबणे हे पिछाडीवर आहे. मतमोजणीच्या सहाव्या फेरीअखेर अंतापूरकर यांनी 7768 मतांनी आघाडी घेतली आहे. 


पोटनिवडणुकीची मतमोजणी 30 फेऱ्यापर्यंत पार पडणार आहे. एकूण 12 उमेदवार या निवडणुकीत उभे होते. शनिवारी देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले होते. जवळपास 64 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक घेण्यात आली होती. 


याआधी पंढरपूरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला धक्का दिला होता. पंढरपूरच्या निकालाची पुनरावृत्ती होईल, असा दावा भाजपच्या गोटातून करण्यात येत होता. भाजपने शिवसेनेचे सुभाष साबणे यांना निवडणुकीची उमेदवारी देऊन महाविकास आघाडीला धक्का दिला होता. मात्र, भाजपचा हा डाव यशस्वी होणार नसल्याचे काँग्रेसने म्हटले होते. निवडणुकीच्या आधी शिवसेनेत असलेले सुभाष साबणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना प्रवेश केल्यानंतर उमेदवारीही मिळाली तर दुसरीकडे काँग्रेसनं दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांना संधी दिली.


वर्ष 2019 साली पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर 89 हजार 400 मताधिक्य मिळून विजयी झाले होते. त्याचप्रमाणे त्यावेळचे शिवसेना भाजप युतीचे उमेदवार सुभाष साबणे यांना 66 हजार 560 तर वंचित बहुजन आघाडीचे तत्कालीन उमेदवार रामचंद्र भरांडे यांना 13 हजार 300 इतकी मते मिळाली होती. 


 


दिग्गजांच्या प्रचारसभा


 या निवडणुकीत प्रचारासाठी दिग्गजांनी हजेरी लावली आणि विजयाचा दावा केला आहे. भाजपकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, नितेश राणे, गोपीचंद पडळकर यांच्या अनेक दिग्गजांच्या सभा पार पडल्यात तर महाविकास आघाडीकडून मंत्री अशोक चव्हाण, छगन भुजबळ, नाना पटोले यांच्यासह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. वंचितकडून प्रकाश आंबेडकरांनी देखील सभा घेतल्या आहेत.