मुंबई : महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून राज्यभरात महाश्रमदान करण्यात आलं. मराठवाड्यापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत अनेक भागात महाश्रमदानाला सुरुवात झाली. इतिहासात पहिल्यांदाच या श्रमदानासाठी शहरांमधून हजारो व्यक्ती गावखेड्यांकडे श्रमदानासाठी गेले होते.
महाश्रमदानामध्ये राज्यभरातील राजकीय नेते, मराठी चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूडमधील कलाकारही सहभागी झाले. उद्योग जगतातील मोठ्या मंडळींनीही श्रमदानासाठी हातभार लावला. श्रमदानात सहभागी होण्याचं आवाहन अभिनेता आमीर खानने केलं होतं.
लातुरात आमिर खान आणि आलिया भट्टच्या हातात कुदळ-फावडं
लातूरमध्ये आमिर खान आणि अभिनेत्री आलिया भट्टी कुदळ-फावडं घेऊन महाश्रमदानात सहभागी झाले.
नाशिकमध्ये किरण राव, सत्यजित भटकळ, अनिता दाते (माझ्या नवऱ्याची बायको फेम राधिका) सहभागी झाले. पुरंदरच्या सकलवाडीत सई ताम्हणकर, तर वाघापूरमध्ये गिरीश कुलकर्णी, अमेय वाघ, ज्योती सुभाष यांनी महाश्रमदान केलं.
याशिवाय जितेंद्र जोशी, पुष्कर श्रोत्री, स्पृहा जोशी, सुनिल बर्वे, अलोक राजवाडे-पर्ण पेठे या कलाकारांनीही विविध ठिकाणी महाश्रमदान केलं.
सकाळी सहा ते आठ आणि संध्याकाळी चार ते सात अशा दोन भागांमध्ये महाश्रमदान करण्यात आलं. यासाठी श्रमदानाच्या साहित्यांचे तब्बले 13 हजार सेट तयार ठेवण्यात आले होते. कुदळ, फावडे आणि तीन टोपल्यांचा मिळून एक सेट तयार करण्यात आला.
अहमदनगरला पाथर्डीत मोनिका राजळेंचं महाश्रमदान
अहमदनगर जिल्ह्यातही महाश्रमदान करण्यात आलं. यंदाच्या पाणी फाऊंडेशनच्या कामाचा शुभारंभ पाथर्डीच्या जोगेवाडीतून झाला होता. अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांच्या उपस्थितीत कामाला सुरुवात झाली होती. त्यामुळे पाथर्डीकरांनी महाश्रमदानात हिरीरीने सहभाग घेतला होता. पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांनी पाणी फाऊंडेशनच्या कामांना भेटी देऊन श्रमदान केलं. पतीच्या निधनाचं दुःख बाजूला सारुन पाणी फाउंडेशनच्या कामात त्यांनी झोकून दिलं.
पिंपळगाव टप्पा या गावात नागरिकांनी महाश्रमदान केलं. या श्रमदानात अबाल-वृद्धांपासून महिलांचा मोठा सहभाग होता. एका इंजिनिअर नव दाम्पत्याने आपल्या लग्नाचा वाढदिवस श्रमदानाने केला. यावेळी नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची, आरोग्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचबरोबर जेवणाचा बेतही होता.
यावेळी आमदार मोनिका राजळे यांनी पाथर्डी दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न असल्याचं सांगितलं. पाथर्डीत पंधरा ते वीस गावात पाणी फाऊंडेशनचं काम सुर आहे.
नंदुरबार जिल्ह्यात जयकुमार रावळांचं महाश्रमदान
नंदुरबार तालुक्यातील आसाने गावात पाणी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित महाश्रमदान कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावळ यांनी सहभागी घेतला. नंदुरबार तालुक्यातील पूर्वपट्टा नेहमीच दुष्काळी असल्याने या भागाला पाणीदार करण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिवसभर श्रमदान केलं.
महाराष्ट्र दिनाला राज्यभरात महाश्रमदान!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 May 2018 08:06 AM (IST)
मराठवाड्यापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत अनेक भागात महाश्रमदानाला सुरुवात झाली. इतिहासात पहिल्यांदाच या श्रमदानासाठी शहरांमधून हजारो व्यक्ती गावखेड्यांकडे श्रमदानासाठी गेले होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -