कल्याण : कल्याणमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे एखाद्या परक्या माणसावर डोळे झाकून विश्वास ठेवणे किती महागात पडू शकते हे उघड झाले आहे . निवृत्ती वेतनासह लाखो रुपयाचे घबाड लाटण्यासाठी वृद्ध इसमाचा विश्वास संपादन केला. त्याचे बँकेचे डीटेल्स मिळवून त्याला माळशेज घाटात 300 फूट खोल ढकलून दिले मात्र नशीब बलवत्तर असल्याने ते वाचले. इतकेच नव्हे तर दरीतून अंधारातून रस्त्यावर येत त्यांनी पोलीस ठाणे गाठत आरोपी विरोधात तक्रार केली.तत्काळ या प्रकरणाचा पोलिसांनी तपास करत अवघ्या 12 तासात दोघा आरोपींना अटक करत त्यांच्याकडून चोरलेले 26 तोळे सोन्याचे दागिने, 75 हजार रोख रक्कम आणि त्यांची मोटर सायकल जप्त केली आहे.


कल्याण पश्चिमेकडील राधानगर परिसरात राहणारे प्रकाश भोईर हे 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिक रेल्वेतून सेवा निवृत्त झाले होते. मात्र त्यांची पत्नी आणि आणि दोन मुली त्यांच्या पासून विभक्त राहत असल्याने ते घरात एकटेच राहत होते. शैलेश गायकवाड हा त्यांच्या मित्राचा मुलगा असल्याने विश्वासाने त्यांनी आपले सर्व आर्थिक व्यवहार त्यांनी शैलेशवर सोपवले होते. मात्र त्यांच्याकडे असलेली लाखो रुपयाची संपत्ती पाहून शैलेशचे डोळे फिरले. घरातील दुरुस्तीचे काम भोईर यांनी आपल्याला द्यावे अशी शैलेशची अपेक्षा होती. मात्र त्यांनी ते काम दुसऱ्याला दिल्याने त्याला राग आला होता . याच रागातून त्याने भरत गायकवाड आणि प्रदीप जाधव याने मित्रांसोबत घेत प्रकाश यांची हत्या करण्याचा कट रचला.


यासाठी शैलेशने 25 जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास आपले पैसे एकजण परत देत नसून त्याला समजवण्यासाठी चला असे सांगत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुरबाड शाखेजवळ बोलावून घेतले. तिथे त्यांना रिक्षात बसवून या तिघांनी त्यांना माळशेज घाटात नेत त्यांना मारहाण करत त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांनी त्यांना दरीत ढकलले. मात्र ते झाडीत अडकले यामुळे आरोपींनी त्यांना पुन्हा आणखी खाली ढकलून दिले. त्यानंतर सात वाजण्याच्या सुमारास तिघांनी तेथून पळ काढला. मात्र भोईर याचे दैव बलवत्तर म्हणून झाडाच्या फांद्यावर अडकल्याने ते वाचले.


शुद्धीवर आल्यावर प्रकाश भोईर यांनी झाडाच्या फांद्याचा आधार घेत अंधारातून वर येत रस्त्याने येणाऱ्या वाहनाची मदत घेत टोकावडे पोलीस ठाणे गाठले. तिथून पोलिसांनी त्यांना कल्याणात आणले. कल्याण रेल्वे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असून याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली. पोलिसांनी शैलेश आणि भरत या आरोपींना अटक केली आहे. तर प्रदीप सावंत हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.


दरम्यान आरोपींनी भोईर यांचा मृत्यू झाल्याचे समजून परत येत त्यांच्या घराच्या डुप्लिकेट चावीने शैलेश याने त्यांच्या घरात प्रवेश करून त्यांच्या कपाटातील 75 हजार रुपये रोख 26 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, त्यांची एटीएम आणि दुचाकी चोरून नेली. या एटीएमद्वारे त्याने त्यांच्या खात्यातील 40 हजार रुपये काढून घेतले. पोलिसांनी त्यांना घटना घडल्यापासून 12 तासाच्या आत अटक करत चोरलेली सर्व रक्कम आणि दागिने हस्तगत केल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.


संबंधित बातम्या :