मुंबई: राज्यातील कोरोनाचा धोका आता पुन्हा एकदा वाढत असल्याचं चित्र आहे. आज एकाच दिवसात राज्यात 694 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज दिवसभरात 184 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही.
राज्यात आजपर्यंत एकूण 79,92,229 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.14 टक्के एवढे झाले आहे.
• आज राज्यात 694 नवीन रुग्णांचे निदान
• राज्यात आज एकही करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.82 टक्के एवढा आहे.
• राज्यात आज रोजी एकूण 3,016 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. सर्वाधिक सक्रिय रुग्णसंख्या ही मुंबईत आढळते, त्यानंतर ठाणे आणि पुण्याचा क्रमांक लागतोय.
कोरोनाच्या नव्या XBB.1.16 व्हेरियंटचा धोका
देशात कोरोनाच्या XBB.1.16 व्हेरियंटचा पहिला रुग्ण जानेवारी महिन्यामध्ये आढळला होता. सध्या देशात कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. तज्ज्ञांच्या मते, रुग्ण वाढीचं कारण XBB.1.16 व्हेरियंट आहे. INSACOG ने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या नव्या XBB.1.16 व्हेरियंटचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये सापडले आहेत.
ज्यात कोरोनाच्या एक्सबीबी 1.16 रुग्णांची संख्या 230 वर पोहोचली आहे. तर यापैकी एका रुग्णाचा मृत्यू देखील झाला आहे. उर्वरित रुग्ण बरे झाल्याची माहिती आहे. एक्सबीबी 1.16 सब-व्हेरियंटचे रुग्ण सर्वाधिक पुण्यात आहेत. पुण्यात एकूण 151 रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाच्या XBB 1.16 व्हेरियंटचा प्रसार इतर विषाणूंच्या तुलनेत खूप जास्त आहे. यामुळे सरकारने सावधगिरी खबरदारी बाळगण्यास सांगितलं आहे.
राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचे सर्वेक्षण 24 डिसेंबरपासून सुरुच आहे. राज्यात दररोज सरासरी 6 हजार 204 चाचण्या केल्या जातात. काही जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट वाढला आहे. सोलापुरातील पाॅझिटिव्हीटी रेट 20.05 टक्क्यांवर तर सांगलीत पॉझिटिव्हिटी रेट 17.47 टक्क्यांवर आहे.
राज्यात काल (29 मार्च) 483 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. मुंबई, पुणे, ठाणे, रायगड आणि नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ॲक्टिव्ह रुग्णसंख्या आहे
एकूण सक्रिय रुग्णसंख्येच्या 80 टक्के ॲक्टिव्ह रुग्ण मुंबई, पुणे, ठाणे, रायगड आणि नाशिकमध्ये आहे.
भारतातील कोरोना प्रकरणांची आकडेवारी
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाचे 13,509 सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत 4,41,68,321 लोकांना कोरोनावरील उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याच वेळी, आतापर्यंत 5,30,862 लोकांना कोरोना संसर्गामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.