मुंबई : राज्यात सध्या कोरोनाचे संकट असून, आता आक्सिजन तुटवडा देखील जाणवू लागला आहे. त्यातच आता बाहेरून राज्यातून ऑक्सिजन आणण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली. मात्र ऑक्सिजनचे टँकर आणण्यासाठी सरकारला ड्रायव्हरचं मिळत नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आता एसटीचे ड्रायव्हर हे ऑक्सिजन टँकर चालवणार आहेत, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी तशी माहिती दिली आहे.
ग्रीन कॉरिडॉरची योजना
राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाकडून ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. त्याचे कोऑर्डिनेशन परिवहन विभाग करत आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे काही टँकर्सचे ड्रायव्हर्स गावाला निघून गेले आहेत. त्यामुळे ड्रायव्हर्सचा तुटवडा निर्माण झाला आहे. म्हणून आम्ही परिवहन विभागाचे ड्रायव्हर्स ऑक्सिजनचे टँकर आणण्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत, असे परब यांनी सांगितलं. तसेच आजपासूनच ऑक्सिजन पुरवठा करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. तसेच गरज असेल तिथे ऑक्सिजन पोहचवण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर केले जाईल असे देखील अनिल परब म्हणालेत.
परिवहन खाते खंबीर!!
एवढेच नाही तर परिवहन खाते कोणत्याही कामात मागे पडणार नाही. तसेच आजपासूनच ऑक्सिजन पुरवठा करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी आरोग्य विभागाशी समन्वय साधला जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली. राज्य सरकारने फेरीवाला, रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी मदत पॅकेज जाहीर केले आहे. त्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली आणि या बैठकीत उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार तात्काळ मदतीसाठी राज्य सरकारने मदत सुरू केली आहे, असं ते म्हणाले. तसेच कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाना मदत मिळालेली नाही यावर बोलताना परब म्हणाले की, 2 दिवसांपूर्वी बैठक घेतली होती यादी मागितलेली असून, किती जणांचा मृत्यू झाला आणि मदत किती जणांना मिळाली, जर नाही मिळाली तर का नाही मिळाली याचा शोध घेत असून मदत आणि पुनर्वसन विभागासोबत बोलणी झाल्याचेही परब म्हणालेत.
आता रस्ते वाहतूक करणाऱ्यांवरही होणार कारवाई
राज्यात कडक निर्बंध असताना अनेक जण विनाकारण वाहनांनी रस्त्यावर फिरत असताना यांच्यावरही आता कारवाई होणार असे संकेत राज्याचे परीवहन मंत्री अनिल परब यांनी दिले आहेत. लवकरच परिवहन खाते याबाबत नियमावली ठरवणार असून,यामुळे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. रस्ते वाहतूक करणाऱ्यांमुळे कोरोना वाढू नये यासाठी कडक कारवाई करणार असल्याचे अनिल परब यांनी सांगितले.