मुंबई : राज्यात आज नवीन कोरोना बाधित रुग्णसंख्येचा उद्रेक झालेला पहायला मिळाला आहे. राज्यात आज तब्बल 40 हजार 414 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यात काल मध्यरात्रीपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तर निर्बंधांचे काटेकोर पालन होत नसल्याने लॉकडाऊनबाबत नियोजन करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे.


आज नवीन 17 हजार 874 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत एकूण 23,32,453 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 325901 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 85.95% झाले आहे. आज दिवसभरात कोरोनाने 108 रुग्णांचा बळी घेतला आहे.


पुण्यात परिस्थिती गंभीर
कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. पिंपरी चिंचवड शहरात पहिल्यांदाच एका दिवसात दोन हजारांचा टप्पा ओलांडला. आज 2275 रुग्णांची नोंद. गेल्या वर्षी एका दिवसांत 1500 च्या वर रुग्ण आढळले नव्हते. दुसरी लाट शहरवासीयांचं चांगलंच कंबरडे मोडले. तर पुणे शहरात आज नव्याने 4 हजार 426 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता 2 लाख 59 हजार 112 इतकी झाली आहे.


राज्यात लवकरचं लॉकडाऊन होणार?
राज्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स, व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र असून आज झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या. यासंदर्भात आज आयोजित या महत्वाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे तसेच मुख्य सचिव सीताराम कुंटे, टास्क फोर्स डॉक्टर्स व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निर्बंध आणि नियमांचे कडक पालन होणार नसेल तर येत्या काही दिवसांत संपूर्ण लॉकडाऊन लावून संसर्ग थोपवावा यावर चर्चा केली.


यावेळी मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अभ्यागतांना पूर्ण प्रवेशबंदी घालावी तसेच खासगी कार्यालये व आस्थापना 50 टक्के कर्मचारी संख्येचे निर्बंध पाळत नसतील तर लॉकडाऊनची तयारी करावी अशा स्पष्ट सूचना बैठकीत दिल्या.