अकोला : देशात राजकारण स्वत:च्या स्वार्थासाठी हिंदू आणि मुस्लिम समाजात दरी निर्माण करण्याचे प्रयत्न काही शक्ती सातत्याने करत असतात. मात्र, दोन्ही धर्मांतील स्वत:ला धर्माचे तथाकथित 'तारणहार' दाखवू पाहणाऱ्या ठेकेदारांना एका कृतीतून सणसणीत चपराक मिळाली आहे. अन आपल्या सहज अन साध्या कृतीतून हा नवा आदर्श घालून दिला आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालूक्यातल्या तळेगाव बाजार या गावानं.


26 मार्चला तळेगाव बाजार येथे नवीन मशिदीचं लोकार्पण आणि उद्घाटन झालं. अन् कार्यक्रमाचं उद्घाटन मुस्लिम समाजातील कुणा राजकीय अथवा धार्मिक नेत्याच्या हस्ते झालं नाही. तर या मशिदीचं उद्घाटन केलं गावातील हिंदू धर्मातील  जेष्ठ व्यक्तींच्या हस्ते. तेल्हारा तालुक्यातील तळेगाव बाजार येथे अकोली रोडवर ही नवी मशिद बांधण्यात आली आहे. हा लोकार्पण सोहळा म्हणजे 'हिंदू-मुस्लिम एकात्मते'च्या आदर्शाचा परिपाठच. या कार्यक्रमाला मुर्तिजापूर तालूक्यातल्या सोनोरी येथील मदरशाचे मुफ्ती महमंद रोशनशा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी मुफ्तींनी हिंदू-मुस्लिम एकात्मतेतूनच भारत अन जगाच्या कल्याणाची दारं उघडणार असल्याचं म्हटलं. यावेळी उपस्थित हिंदू बांधवांना त्यांनी इस्लाममधील नमाज पठणाचं महत्व पटवून सांगितलं. यावेळी खामगावचे मुफ्ती महमंद जुनेद मास्टर ईत्तियाकसाहब 'मानव' हेसुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते. मशिदीत मुस्लिम बांधवांचे नमाजपठण झाल्यावर हिंदू बांधवांना मराठीतील कुराणाच्या प्रती भेट म्हणून देण्यात आल्यात. यावेळी हिंदू बांधवांच्या वतीने मुफ्ती मोहम्मद रोशनशा यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.


मशिदीचे भूमिपूजनही झाले होते हिंदू बांधवांच्याच हस्ते 


वर्षभरापूर्वी या मशिदीचं बांधकाम सुरू झालं होतं. या मशिदीच्या भूमिपूजनासाठीही गावातील हिंदू बांधवांनी पुढाकार घेतला होता. भूमिपूजनाचा कार्यक्रमही गावातील हिंदू आणि मुस्लिम समाजानं एकत्र येत केला होता. भूमिपूजनाचा मानही गावातील हिंदू धर्मातील जेष्ठ व्यक्तींना देण्यात आला होता. मागच्या वर्षभरात बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर गावातील हिंदू बांधवांनी बांधकामासाठी मुस्लिम बांधवांना अडचण येऊ नये याची काळजी घेतली. या महिन्यात या मशिदीचं काम पूर्ण झालं अन गावकऱ्यांनी मिळून कोरोना काळात नियम पाळत मशिदीचं लोकार्पणही अगदी दणक्यात केलं. ही मशिद म्हणजे सध्याच्या काळात सर्वार्थाने हिंदू-मुस्लिम धार्मिक एकात्मतेचं 'जीवंत प्रतिक' बनली आहे. 
मशिदीच्या माध्यमातून तळेगाव बाजार या गावानं एका उर्दू कवीच्या ओळी खऱ्या करून दाखविल्या आहेत. तो म्हणतो की, 


''आज मुझे फिर इस बात का गुमान हो, 
मस्जिद में भजन मंदिरों में अज़ान हो, 
खून का रंग फिर एक जैसा हो, 
तुम मनाओ दिवाली, मेरे घर रमजान हो। 
दोस्ताना इतना बरकरार रखो कि, 
मजहब बीच में न आये कभी, 
तुम उसे मंदिर तक छोड़ दो , 
वो तुम्हें मस्जिद छोड़ आये कभी।''




कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावाचा पुढाकार 


सदर कार्यक्रमासाठी माजी पोलिस पाटील जनार्दन खारोडे, रघु खारोडे, सुरेश मानखैर, रावसाहेब खारोडे, बाबुराव पाटील, पत्रकार सदानंद खारोडे, दिलीप खारोडे, गुणवंत खारोडे, बाळासाहेब अरबट, उद्धव मानखैर, माजी उपसरपंच कुद्दूसभाई, इरफान अली, मोहम्मद इद्रिस, रतन दांडगे, गोपाल चिमणकर यांनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमासाठी मशिद संस्थानचे अध्यक्ष रशिदशा बब्बुशा, हैदरशा सत्तारशा, मुजफ्फर अयुबशा, शफिकअली मिर यांच्यासह सर्व गावकऱ्यांनी पुढाकार घेतला. मशिदीच्या लोकार्पण सोहळ्यानंतर गावातील सर्व हिंदू बांधवांना मुस्लिम समाजाच्या वतीने 'गावभोजन' देण्यात आले.   


Holi 2021 | होळीनिमित्ताने रेवस- करंजाच्या समुद्रात कोळ्यांच्या सुशोभित होड्यांनी वेधलं लक्ष 


1959 मध्ये 'धुल का फुल' चित्रपटात साहिर लुधियानवी यांचं एक गीत होतं. या गाण्याचं 'सार'च तळेगावच्या नागरिकांनी आपल्या सहज आणि साध्या कृतीतून सांगितलं आहे. 


'मैं मुस्लिम हूँ, तू हिन्दू है, हैं दोनों इंसान,
ला मैं तेरी गीता पढ़ लूँ, तू पढ ले कुरान,
अपने तो दिल में है दोस्त, बस एक ही अरमान,
एक थाली में खाना खाये सारा हिन्दुस्तान।
तू ना हिन्दु बनेगा, ना मुसलमान बनेगा
इन्सान की औलाद है, इन्सान बनेगा' 


अलिकडे समाजात, जाती-जातीत फुट पाडणाऱ्या प्रवृत्तींचे मोठं पिक देशात वाढतं. अनेक संकटातही हे विष वेगानं समाजात पसरविण्याचे प्रयत्न होत आहेत. सध्याच्या काळात विद्वेष आणि नकारात्मकतेचं हे वाळवंट सर्वत्र दिसून येत आहे. अशा परिस्थितीत अकोला जिल्ह्यातील तळेगाव बाजार गावानं घालून दिलेला हा आदर्श माणुसकीची हिरवळ फुलविणारा म्हणावा लागेल.