मुंबई : राज्यात आज 10 हजार 219 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 21 हजार 081 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आता 55,64,348 इतकी झाली आहे तर रिकव्हरी रेट 95.25 टक्के झाला आहे. आज 154 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आज एकूण 1,74,320 सक्रीय रुग्ण आहेत. सध्या राज्यात 12,47,033 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 6,323 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यातील परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत आहे. राज्यातील एकूण 30 जिल्हे आणि महानगरपालिका क्षेत्रात आज एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. मुंबई महापालिका क्षेत्रात सर्वाधिक 28, कोल्हापूरमध्ये 27, कोल्हापूर महापालिका क्षेत्रात 14, अहमदनगरमध्ये 11 तर सोलापूरमध्ये 10 मृत्यूंची नोंद झाली आहे.
मुंबईत 794 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 794 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 833 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत एकूण 6,78,278 रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत 16070 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर आता 95 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रुग्ण दुप्पटीचा दर 527 दिवसांवर पोहोचला आहे.
21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांना मोफत लस : पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशातील सर्व नागरिकांच्या लसीकरणाची सर्व जबाबदारी केंद्र सरकार घेणार असल्याची घोषणाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. 21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांना केंद्राकडून मोफत लस दिली जाणार आहे. त्यामुळे राज्य सरकारला लसीकरणासाठी काहीही खर्च करावा लागणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, लसीकरणाची 25 टक्के जबाबदारी ही राज्य सरकारांची होती. ती जबाबदारीही भारत सरकार घेईल. येत्या 2 आठवड्यांत ही व्यवस्था लागू केली जाईल. या दोन आठवड्यांत केंद्र आणि राज्य सरकार एकत्रित नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक तयारी करतील. भारत सरकार स्वतः लस उत्पादकांकडून एकूण लस उत्पादनापैकी 75 टक्के खरेदी करुन ती राज्य सरकारांना विनाशुल्क देईल, असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.
देशात 1 लाख 636 नवे कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार मागील 24 तासांमध्ये देशात 1 लाख 636 नवे कोरोनाबाधित आढळले. तर, 2427 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर 1 लाख 74 हजार 399 कोरोनाबाधितांनी या विषाणूच्या संसर्गावर मात केली. मागील 24 तासांत निदान झालेल्या कोरोनाबाधितांचा आकडा मागील 61 दिवसांमधील सर्वात कमी आहे. यापूर्वी 7 एप्रिलला इतक्या कमी रुग्णांची नोंद झाली होती.