Covid Third Wave  :  राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुन्हा एकदा लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंतेत वाढ झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर एबीपी माझाने टास्क फोर्सचे सदस्या डॉ. राहुल पंडित यांच्यासोबत संवाद साधला. पुढील सहा आठवडे चिंतेचे आहेत. आपल्याला कोरोना नियम पाळून आणि स्वयं शिस्त बाळगून विषाणू सोबत जगायला शिकावं लागणार असल्याचं मत यावेळी टास्क फोर्स सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी व्यक्त केलं आहे. रुग्णाची संख्या आटोक्यात न आल्यास तिसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नसल्याचेही डॉ. राहुल पंडित यांनी सांगितलं. 


सध्याच्या परिस्थितीला कोरोनाची तिसरी लाट याला म्हणायचं का ?
सध्याच्या घडीला ज्याप्रकारे रुग्ण संख्या वाढती आहे ते बघता ही चिंता आहे की ही तिसऱ्या लाटेची सुरुवात आहे.  


मोठ्या शहरांमध्ये तरी आपण ही तिसऱ्या लाटेची सुरुवात म्हणू शकतो का?
लाट आपण तेव्हा म्हणतो जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र मध्ये तशाच प्रकारचे रुग्णसंख्या आढळत असते.. मात्र अजूनही सुदैवाने ग्रामीण भागात संख्या तशी वाढली नाही


ही कोरोना रुग्णवाढ ओमायक्रोनमुळे आहे का ? 
जोपर्यंत जीनोम सिक्वेन्सीन्गचा  अहवाल समोर येत नाहीत, तोपर्यंत आपण सांगू शकत नाहीत की ही रुग्ण संख्यातील वाढ ओमायक्रोन मुळे आहे. पण ज्या प्रकारे कोरोना रुग्णांची संख्या दुपटीने वाढते ते पाहता हा गुणधर्म ओमायक्रॉनचा असल्याचं दिसतंय, डेल्टा ची गुणधर्मामध्ये इतक्या झपाट्याने रुग्ण वाढ होत नव्हती. जिनोम सिक्वेन्सीन्गच्या अहवालानंतर मला असं वाटतं की मिक्स पिक्चर म्हणजे डेल्टा आणि ओमायक्रोनचे रुग्ण यामध्ये असतील. डेल्टाला पूर्णपणे व ओमायक्रोननी रिप्लेस केले असं अद्याप भारतामध्ये दिसले नाही. 


राज्यात नेमकी कोरोना रुग्ण वाढ आणखी होत राहिली तर काय तयारी करावी लागेल ?
रुग्णसंख्या खूप वाढत असेल आणि रुग्णांमध्ये माईल्ड लक्षण असतील तर त्यांना इन्स्टिट्यूशन क्वांराटाइन करता येईल. रुग्णांना सौम्य लक्षणं असल्यास अधिकाधिक होम क्वांरटाइन केल्यास रूग्णालयवरील ताण कमी होईल. रुग्णालयात जर रुग्ण मोठ्या प्रमाणात भरती व्हायल लागले, तर आपल्याला त्यानुसार रुग्णालय सुद्धा आता तयार करावे लागतील...बेडस आपल्याला टप्प्याटप्प्याने रुग्णांसाठी तयार ठेवावे लागतील.  


लसीकरणाचा कितपत फायदा झाला ?
लसीकरण या विषाणू विरोधात लढायला फायदेशीर ठरत आहे. लसीकरणामुळे रुग्णांमध्ये गंभीर लक्षणे फारसे दिसत नाहीत आणि त्यामुळे धोका कमी झाला आहे...लसीकरण झाल्यावर तुम्हाला इन्फेक्शन कधीच होणार नाही,असं होत नाही. ओमायक्रोन जरी लसीकरण झालेल्या व्यक्तीला किंवा कोरोना  झालेल्या व्यक्तीला झाला तरी त्याच्यामध्ये सौम्य लक्षणे दिसतात.. लसीकरण फायदेशीर ठरले यात वादच नाही. शाळांबाबत चाईल्ड टास्क फोर्स निर्णय घेईल 


दिल्लीसारखे निर्बंध मुंबईत लावले जाऊ शकतात का? निर्बंध आणखी कडक केले जाऊ शकतात का ?
निर्बंधाबाबत मी फार बोलणार नाही ..मला असं वाटतं की या विषाणू सोबत जगायला आपण शिकले पाहिजे.. स्वयंशिस्त स्वतःला लावली पाहिजे. स्वतःला स्वयंशिस्त लावली तर हे निर्बंध सध्या पुरेसे आहेत