Maharashtra Corona Update : गेल्या चार ते पाच दिवसांपासून कोरोना रूग्णांच्या संख्येत रोज घट होत आहे. सोमवारी राज्यात 414 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर एका कोरोना रूग्णाचा मृत्यू झालाय. गुरुवारी राज्यात 1076 कोरोनाच्या रूग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर शुक्रवारी 955 रूग्णांची नोंद झाली होती. शनिवारी 734 नव्या रूग्णांची नोंद झाली होती. रविवारी राज्यात 701 नव्या रूग्णांची नोंद झाली होती. परंतु, यात घट होऊन आज 414 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. गेल्या चार दिवसांतील ही आकडेवारी पाहाता गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रूग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ही राज्यासाठी दिलासादायक बाब आहे. रूग्णसंख्या कमी होत असली तरी अद्याप कोरोना संपूर्ण धोका टळलेला नाही त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज 771 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत 79,57,095 करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98. 10 टक्के झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून नव्या रूग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे राज्यातील सक्रिय रूग्णांच्या संख्येत देखील घट होत आहे.
मृत्यूमध्ये घट
कोरोना बाधितांच्या मृत्यूमध्ये देखील घट होत आहे. शुक्रवारी राज्यात सहा बाधितांचा मृत्यू झाला होता. तर रविवारी तीन कोरोना बाधितांचा मृत्यू झाला होता. तर आज केवळ एका बाधिताचा मृत्यू झालाय. सध्या राज्यातील मृत्यूदर 1. 82 टक्के एवढा आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहिनुसार, राज्यात सध्या 5862 कोरोनाचे सक्रिय रूग्ण आहेत. यात सर्वाधिक संख्या ही मुंबईतील आहे. मुंबईत सध्या 1666 सक्रिय आहेत. मुंबई पाठोपाठ ठाण्यात 1290 सक्रिय रूग्ण आहेत. त्या खालोखल पुण्यात सध्या 1237 कोरोनाचे सक्रिय रूग्ण आहेत.
देशातील स्थिती
राज्यासह देशात कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) संख्येत देखील घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 5 हजार 221 दैनंदिन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील एकूण बाधित रुग्णांचा आकडा वाढून 4 कोटी 45 लाख 50 इतका झाला आहे. आरोग्य मंत्रालयानं (Ministry Of Health) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशात अॅक्टिव्ह रुग्णांची (Active Case) संख्या 47 हजार 176 वर पोहोचली आहे.