Maharashtra Corona Update : महाराष्ट्रात काल 23 एप्रिल रोजी 545 कोरोना रुग्णाची नोंद झाली, त्यापैकी 141 रुग्ण हे एकट्या मुंबईतील असल्याचं समोर आलं. शनिवारी राज्यभरात नोंदवलेल्या 850 कोरोना रुग्णांच्या तुलनेत ही 35% घट आहे, चाचणी कमी झाल्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळतं. रविवारी राज्यात दोन मृत्यूंची नोंद झाली. यामध्ये मुंबई आणि रत्नागिरीतील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. महाराष्ट्रात कोविड चाचण्यांमध्ये घसरण झाल्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या देखील 35 टक्क्यांनी कमी झाल्याचं दिसून आलं.
कोविड चाचण्यांची आकडेवारी काय सांगते?
रविवारी सुमारे एकूण 8,278 लोकांच्या चाचण्या झाल्याची नोंद आहे. त्यापैकी 5,540 चाचण्या सरकारी प्रयोगशाळेत झाल्या, 2,616 खाजगी प्रयोगशाळांमध्ये आणि 122 चाचण्या या स्वत: घेण्यात आलेल्या होत्या. महाराष्ट्रातील 6,000 सक्रिय कोरोना रुग्णांपैकी 301 (4%) रुग्ण हे दवाखान्यात उपचार घेत आहेत, त्यापैकीच सुमारे 60 रुग्ण ICU मध्ये आहेत. मुंबईतील 7 कोरोना रुग्ण हे रुग्णालयात दाखल होऊन सध्या उपचार घेत आहेत.
रुग्णालयांकडून लसीची मागणी शून्य : आदर पुनावाला
दोन दिवसांपूर्वीच देशभरातील वाढत्या कोरोना प्रकरणांवर भाष्य करताना सीरम इन्स्टिट्यूटच्या आदर पुनावालांनी कोरोना व्हायरसचा सध्याचा प्रकार गंभीर नसल्याचे म्हटलं होतं. आमच्याकडे कोरोना प्रतिबंधक लसींचे पाच ते सहा दशलक्ष डोस उपलब्ध आहेत, परंतु रुग्णालयाकडून कोरोना लसींची मागणी होत नसल्याचे ते म्हणाले. येत्या दोन ते तीन महिन्यांत सीरम इन्स्टिट्यूट आणखी कोविशील्ड डोस देखील तयार करणार आहे. माध्यमांशी संवाद साधताना आदर पुनावाला म्हणाले की, "आम्ही 5 ते 6 दशलक्ष कोरोना लसींचे डोस तयार ठेवले आहेत. मात्र रुग्णालयांकडून कोरोना प्रतिबंधक लसींची मागणी शून्य आहे, कोरोना लसींची मागणी थांबली आहे. पुढे ते म्हणाले, कोरोना विषाणूचा सध्याचा प्रकार फारसा गंभीर नसून ज्येष्ठ नागरिकांनी खबरदारी म्हणून बूस्टर डोस घ्यावा."
केंद्राच्या राज्य सरकारांना सूचना
दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच केंद्राने उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि महाराष्ट्रासह आठ राज्यांना सतर्क राहण्याच्या आणि गर्दीच्या ठिकाणी खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. कोरोनाचा प्रसार असणाऱ्या भागात उपाययोजना करण्यासही केंद्राने सांगितले आहे. यूपी, तामिळनाडू, राजस्थान, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, हरियाणा आणि दिल्लीला कोरोनाबाबत लिहिलेल्या पत्रात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी या राज्यांना कोणत्याही स्तरावर हलगर्जीपणा दाखवू नये, असे आवाहन केले आहे. आज (24 एप्रिल) राज्यातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 6055 आणि दोन जणांचा कोरोनाने मृत्यू झाला.
महत्वाच्या बातम्या
जळगावात कोरोना काळात 400 कोटींचा घोटाळा; सभेपूर्वीच संजय राऊतांचा गुलाबराव पाटलांवर गंभीर आरोप