मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या हळूहळू वाढताना दिसत आहे. आज राज्यामध्ये 311 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासामध्ये एकूण 270 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. गुरूवारी राज्यामध्ये 316 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. 


आज एकही मृत्यू नाही


राज्यात आज एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला नाही. राज्यातील मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका आहे. तर राज्यात आतापर्यंत 77,32, 552 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.10 टक्के इतके झाले आहे. 


राज्यात 1761 सक्रिय रुग्णांची नोंद


राज्यात आज एकूण 1761 इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 1144 रुग्ण हे मुंबईमध्ये आढळतात. तर त्या खालोखाल पुण्यामध्ये, 310 इतके सक्रिय रुग्ण आहेत. 


गेल्या 24 तासांत 2259 नव्या कोरोना रुग्णांची नोंद


काही दिवसांच्या वाढीनंतर देशातील कोरोना (Covid-19) प्रादुर्भावात पुन्हा एकदा घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या आकडेवारीत (Coronavirus) चढ-उतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 2259 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 20 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. यापूर्वी 19 मे रोजी जवळपास 2300 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात सध्याची अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 15044 वर पोहोचली आहे. यापूर्वी एका दिवसाआधीच्या रुग्णसंख्येची तुलना करायची झाली, तर कालच्या तुलनेत आजच्या संख्येत काहीशी घट झाल्याचं दिसून आलं आहे. तर मृतांच्या आकड्यात मात्र काहिशी वाढ झाली आहे. 19 मे रोजी कोरोनामुळे 10 जणांचा मृत्यू झाला होता, तर एका दिवसातच हा आकडा दुप्पट झाला आहे. गेल्या 24 तासांत 20 रुग्णांनी कोरोनामुळं जीव गमावला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे.