मुंबई: राज्यातील कोरोनाची आकडेवारी स्थिर असल्याचं चित्र आहे. आज राज्यात 231 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली तर दिवसभरात 208 रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 98.11 टक्क्यांवर पोहोचलं आहे. राज्यात बुधवारी 221 रुग्णांची भर पडली होती. 


राज्यात आज एका मृत्यूची नोंद
गेल्या 24 तासामध्ये राज्यामध्ये एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्याचा मृत्यूदर हा स्थिर असून तो 1. 87 इतका आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 77,30,789 इतके कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. तर राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 78,80,074 इतकी झाली आहे. 


राज्यामध्ये 1434 इतकी सक्रिय रुग्णसंख्या आहे. त्यामध्ये सर्वाधिक सक्रिय रुग्णसंख्या ही मुंबईत असून ती 860 इतकी आहे. तर त्या खालोखाल पुण्याचा क्रमांक लागत असून त्या ठिकाणी 288 इतकी सक्रिय रुग्णसंख्या आहे.


देशातील स्थिती
देशात कोरोना विषाणूच्या वाढता आलेख मागील काही दिवसापासून घटताना दिसत आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येत मोठी घट झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात 2 हजार 827 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून असून 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आधीच्या दिवसाच्या तुलनेनं नवीन कोरोना रुग्णांची संख्या 70 ने घटली आहे. तर गेल्या 24 तासांमध्ये 24 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आधीच्या दिवशी कोरोनाबळींची संख्या 54 होती.


मुंबईची स्थिती
मुंबईत गेल्या काही दिवासंपासून कोरोना रूग्णांच्या संख्येत चढउतार होत आहे. आज मुंबईत 139 कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे.  काल मुंबईत124 रूग्णांची नोंद झाली होती, कालपेक्षा आज 15 रूग्णांची वाढ झाली आहे. तर आज 130 रूग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे आतापर्यंत  1040754 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुबईत सध्या कोरोनातून बरे होण्याचा दर 98 टक्क्यांवर पोहचला आहे. तर आज मुंबईत एकाही कोरोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद नाही. 


महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या मुंबईत 860 सक्रिय रूग्ण आहेत. जानेवारीनंतर कमी होत असलेली कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. त्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.