मुंबई: देशात कोरोनाची रुग्णसंख्या हळूहळू वाढत असताना राज्यातील संख्या मात्र काहीशी स्थिर असल्याचं चित्र आहे. राज्यात आज 221 नव्या रुग्णांची भर पडली असून एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासामध्ये राज्यात 211 रुग्ण हे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 


राज्यात आजही एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यूदर हा 1.87 वर स्थिर असल्याचं चित्र आहे. तर आतापर्यंत एकूण 77,30,581 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.11 टक्के इतकं झालं आहे. 


राज्यात सक्रिय रुग्णसंख्या ही 1412 इतकी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक सक्रिय रुग्णसंख्या ही मुंबईत असून ती 851 इतकी आहे. त्या खालोखाल पुण्यामध्ये 284 इतकी सक्रिय रुग्णसंख्या आहे. 


मुंबईत सक्रिय रुग्णसंख्येत 35 टक्क्यांची वाढ 
मंगळवारी मुंबईत 122 नव्या रुग्णांची भर पडली आहे. मंगळवारी दोन रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील 24 तासांत मुंबईत एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. मंगळवारी 100 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 


मुंबईत महिन्याच्या सुरुवातीला शहरात सक्रिय रुग्णांची संख्या 628 इतकी होती. मंगळवारी ही रुग्णसंख्या वाढून 844 वर पोहोचली आहे. तसं पाहायला गेलं तर, शहरात गेल्या 8 दिवसांत दररोज सरासरी 100 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. परंतु, रुग्णालयांमध्ये केवळ एक, दोन रुग्ण दाखल होत असल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, मुंबईत सध्या 25,249 बेड्सपैकी केवळ 25 बेड्सवरच कोरोना रुग्ण दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 


देशातील स्थिती
 देशात गेल्या 24 तासांत कोरोना (Covid-19) व्हायरसच्या 2 हजार 897 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 54 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या (Coronavirus Active Patients) वाढली असून 19 हजार 494 वर पोहोचली आहे. तर कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट (Corona Positivity Rate) 0.61 टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) देशात कोरोनाच्या 2,288 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तसेच, कोरोना प्रतिबंधक राष्ट्रीय लसीकरण मोहीमेत (Corona Vaccination) आतापर्यंत कोरोनाच्या 190.50 कोटींहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत.