मुंबई: महाराष्ट्रातून अयोध्येला जाणाऱ्या यादीत आता आणखी एका नावाची भर पडली असून अॅड. गुणरत्न सदावर्तेही अयोध्येचा दौरा करणार आहेत. आपण राम जन्मभूमीच्या केसमध्ये वकील होतो, त्यामुळे आपल्याला अयोध्येतून बोलावणं आलं आहे असं सांगत आपण लवकरच अयोध्येला जाणार आहे असं अॅड. गुणरत्न सदावर्तेंनी जाहीर केलं आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची मुंबई पोलिसांनी आज पुन्हा एकदा चौकशी केली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. 


अॅड. गुणरत्न सदावर्ते माध्यमांशी बोलताना म्हणाले की, "जय श्रीराम आणि जय भीम म्हणणारे आता कुणालाही घाबरत नाहीत. बँकेची निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर पायाखालची वाळू घसरली. अयोध्येत आमचं साधू आणि महंत स्वागत करणार आहेत. डंके की चोट पर यापुढे विरोधकांना उत्तर देऊ. आमचे हक्क राज्य सरकार असं पायदळी तुडवू शकत नाहीत. कष्टकरी जनसंघ हे हिंदुस्थानला सुजलाम सुफलाम करण्यासाठी या महिन्याच्या शेवटी अयोध्येला जाणार असून प्रभू श्रीरामांचं दर्शन घेणार आहेत."


गावदेवी पोलिसांकडून सदावर्तेंना नोटिस, आज चौकशी
दरम्यान, मुंबई पोलिसांनी अॅड. गुणरत्न सदावर्तेंना पुन्हा एकदा नोटिस पाठवली आहे. त्यामुळे गावदेवी पोलिसांनी आज त्याची चौकशी केली. ही नोटिस राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा सदावर्तेंच्या वकिलांनी केला आहे. गुणरत्न सदावर्तेंना आयपीसी कलम 110 अंतर्गत ही नोटिस पाठवली आहे. ही नोटिस म्हणजे न्यायालयाचा अवमान असल्याचा दावाही सदावर्तेंच्या वकिलांनी केली आहे. आता यावर 14 जून पर्यंत उत्तर देणार असल्याचं सदावर्तेंच्या वकिलांनी स्पष्ट केलं आहे. 


मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे हे अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दोघांच्या नंतर आता अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांच्या पत्नी अॅड. जयश्री पाटील यांच्यासोबत या महिन्याच्या अखेरपर्यंत अयोध्येला जाण्याचं जाहीर केलं आहे. 


अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी 'एसटी कष्टकरी जनसंघ' या संघटनेची स्थापना केली आहे. या माध्यमातून ते एसटी बँकेची निवडणूक लढवणार आहेत. तसेच यापुढे राज्यातील प्रत्येक निवडणूक आपण लढणार असल्याचं त्यांनी घोषित केलं आहे.


महत्त्वाच्या बातम्या: