मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस  वाढताना दिसत आहे.  कोरोनाच्या रुग्णसंख्या रोज  हजाराचा टप्पा ओलांडत आहे. आज राज्यात 1036 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 374 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सर्वाधिक रुग्ण हे मुंबई शहरातील असून मुंबईत आज 676 रुग्णांची नोंद झाली आहे.  राज्यात आज कोरोनाच्या शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. 


आज शून्य कोरोना मृत्यूची नोंद


राज्यात आज एकूण 374 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आतापर्यंत एकूण 77,38, 938 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.03 टक्के इतकं झालं आहे. राज्यात आज शून्य कोरोना मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका झाला आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णाांची एकूण संख्या 78,38, 938 इतकी झाली आहे.


सक्रिय रुग्णसंख्या वाढली


राज्यातील कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या देखील वाढताना दिसत आहे. राज्यात आज एकूण 7429 सक्रिय रुग्ण आढळले असून मुंबईत सर्वाधिक म्हणजे 5238 इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्या खालेखाल ठाण्याचा क्रमांक लागत असून ठाण्यामध्ये 1172  इतके सक्रिय रुग्ण आढळतात. 


मार्चनंतर सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद


देशात गेल्या 24 तासांत 4 हजार 518 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मार्चनंतरची ही सर्वाधिक रुग्ण वाढ नोंदवण्यात आली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 25 हजारांच्या पुढे गेली आहे. सध्या देशात 25 हजार 782 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. तसेच रविवारी दिवसभरात 2779 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. ही तीन महिन्यांतील एका आठवड्यामध्ये नोंद झालेली सर्वाधिक संख्या आहे. दरम्यान, कोरोना मृतांची संख्या कमी झाली आहे.देशात सर्वाधिक कोरोनाबाधित महाराष्ट्रात आणि केरळ आहेत. दरम्यान, 10 राज्यांमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. भारतात रविवारी 4518 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. शनिवारी देशात 4270 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली.