मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी रेमडेसिवीरच्या मुद्यावरून केंद्र सरकार राजकारण करत आहे, असा आरोप केला आहे. यावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कोरोनाच्या कठिण काळात गलिच्छ राजकारण करू नका असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी त्यांना दिला आहे. एवढेच नाही तर उद्धव ठाकरे यांनी अशा बेजबाबदार मंत्र्यांना वेळीच थांबवावं, असं आवाहनही केलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना हे आवाहन केलं आहे.

 

ट्विटमध्ये काय म्हणाले चंद्रकांत पाटील

 

कोरोना काळात राजकारण नको, असे सल्ले देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आधी नवाब मालिकांना आवरावे. आज नवाब मलिक यांनी केंद्रावर केलेले आरोप हे अतिशय तथ्यहीन आणि निराधार आहेत. नवाब मलिक यांनी असे तथ्यहीन आणि निराधार आरोप करण्याऐवजी पुरावे द्यावे अन्यथा माफी मागावी. त्यांच्या जावयाला ड्रग्स प्रकरणी एनसीबीने अटक केली. त्या गोष्टीचा आजही त्यांच्या मनात एवढा रोष आहे की, स्वतःच्या आणि आपल्या सरकारच्या प्रत्येक अपयशाचे खापर ते केंद्रावर किंवा अन्य अधिकाऱ्यांवर फोडतात, असं पाटील यांनी म्हटलं आहे.

 


 

कोरोनाच्या या कठीण काळात गलिच्छ राजकारण करण्यापेक्षा महाविकास आघाडी सरकारने जनतेला आरोग्य सुविधा पुरवाव्या आणि आपले कर्तव्य पार पाडावे. मुख्यमंत्री @OfficeofUT यांनी या प्रकरणात लक्ष घालून आपल्या मंत्र्यांना अशा बेजबाबदार आणि निराधार आरोप करण्यापासून वेळीच थांबावे! असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

 



नवाब मलिकांनी काय म्हटलं?


राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी ट्वीट करत म्हटलं होतं की, महाराष्ट्र सरकारनं रेमडेसिवीरसाठी 16 कंपन्यांना सांगितलं होतं. तेव्हा आम्हाला कंपन्यांकडून सांगण्यात आलं की केंद्र सरकारने त्यांना महाराष्ट्रात औषध न पुरवण्यास सांगितले आहे. या कंपन्यांना केंद्राकडून इशारा देण्यात आला होता की त्यांनी तसे केल्यास त्यांचा परवाना रद्द केला जाईल, असा खळबळजनक आरोप नवाब मलिकांनी केला आहे. आपल्या देशात 16 कंपन्या आहेत ज्यांच्याकडे रेमडेसिवीर निर्यात देणारी युनिट्स आहेत. त्यांच्याकडे रेमडेसिवीरच्या 20 लाख कुपी आहेत. आता सरकारकडून निर्यातीवर बंदी घातली गेली आहे. त्यामुळं ही औषधं आता आपल्या देशात विकायला परवानगी देणं गरजेचं आहे, पण केंद्र सरकार त्यास नकार देत आहे, असं मलिकांनी म्हटलं आहे.