मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. या कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण आणि वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी चिंता व्यक्त केलीय. यावेळी जनतेला काळजी घेण्याचे आवाहन करतानाच जनतेच्या काळजीपोटी सावधानतेचा इशारा दिला आहे. जर ही संख्या वाढत राहिली तर जनतेला पुन्हा एकदा त्रिसूत्रीची आठवण करून द्यावी लागेल असे मत आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांनी व्यक्त केलं.
राज्यात आज गेल्या महिन्याभरातील सर्वाधिक रुग्णवाढ झालीय. आज राज्यात 5 हजार 427 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. गेल्या महिन्याभरात ही संख्या दोन हजार ते तीन हजारच्या दरम्यान मर्यादित होती. यामुळे राज्यमंत्री यड्रावकर यांनी जनतेला त्रिसूत्रीची पुन्हा आठवण करून देतानाच राज्य सरकारला नाईलाजाने लॉकडाऊनबाबत विचार करावा लागेल असे मत व्यक्त केले आहे.
आज 2,543 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून राज्यात आजपर्यंत एकूण 19,87,804 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतल्याची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.5% एवढे झाले आहे. राज्यात आज 38 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.48% एवढा आहे. मात्र, जनतेने योग्य खबरदारी घेऊन अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, कोरोना बाबतच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे अशा सूचना केल्या आहेत. तसेच आरोग्य विभागाने याबाबत सतर्क राहावे असे निर्देश आरोग्य विभागाला दिले आहे.
विदर्भात कोरोनाचा उद्रेक
राज्यातील अमरावती, यवतमाळ, अकोला या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. या जिल्ह्यातील ज्या भागात रुग्ण संख्या जास्त आढळून येत आहे तेथे कंटेनमेंट झोन जाहीर करुन तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्य सचिव संजय कुमार यांनी आज या तीन जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
अमरावती जिल्ह्यातील अचलपुर तालुका, अमरावती महापालिका क्षेत्र, यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ, पुसद आणि पांढरकवढा नगरपरिषद क्षेत्र आणि अकोला जिल्ह्यातील अकोट व मुर्तीजापूर तालुका आणि अकोला महापालिका क्षेत्र या भागामध्ये कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आढळून येत आहेत. या भागातील संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हे सर्व क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करुन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे मुख्य सचिवांनी निर्देश दिले आहेत.