मुंबई : राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. आज 8,010 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 7 हजार 391 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 59 लाख 52 हजार 440 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.17 टक्के आहे.
राज्यात आज 170 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.04 टक्के झाला आहे. तब्बल 31 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 1 लाख 7 हजार 205 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नंदुरबार (70), हिंगोली (71), यवतमाळ (23), गोंदिया (66), चंद्रपूर (22) या पाच जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 17, 401 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
जळगाव, परभणी, जिल्ह्यात आज शून्य रुग्ण आढळले आहेत. तर कोल्हापुरात सर्वाधिक 979 रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,48,24,211 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 61,89, 257 (13.81 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,81,266 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,471 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत गेल्या 24 तासात 545 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना नियंत्रणात असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 545 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 505 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,04,764 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 7,012 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 948 दिवसांवर गेला आहे.
देशात गेल्या 24 तासांत 37 हजार 154 नवे कोरोनाबाधित
देशात गेल्या 24 तासांत 37 हजार 154 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. अशातच काल (रविवारी) 39 हजार 649 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, 724 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात रिकव्हरी रेट वाढून आता 97.22 टक्क्यांवर पोहोचला आहे.