मुंबई : राज्यात आज  6 हजार 17 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर त्याच्या दुप्पट रुग्ण आज कोरोनामुक्त झाले आहेत. आज राज्यात 13 हजार 51 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत 59 लाख 93 हजार 401 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.35 टक्के आहे. 


राज्यातील अॅक्टिव रुग्णसंख्या ही एक लाखाच्या खाली आली आहे. राज्यात सध्या 96 हजार 375 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर राज्यात आज 66 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.04 टक्के झाला आहे.


तब्बल 42 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. जालना (39), हिंगोली (67), यवतमाळ (25), गोंदिया (60), चंद्रपूर (49)  या पाच जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 15,768 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 


मुंबई, पु्ण्यातील कोरोनाची सद्यस्थिती


मुंबईत गेल्या 24 तासात 402 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 577 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,07,129 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 6,349 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1034 दिवसांवर गेला आहे. 


तर पुणे महापालिका क्षेत्रात आज 196 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 289 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुण्यात 2855 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज एकूण सहा रुग्णांच्या मृत्यूची नोंद पुणे महापालिका क्षेत्रात करण्यात आली आहे. 


देशात गेल्या 24 तासांत 38,164 नव्या कोरोनाबाधितांची नोंद


केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने सकाळी 8 वाजता जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 38 हजार 164 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून 38 हजार 660 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात गेल्या 24 तासांत 499 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे 4 लाखांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशाचा पॉझिटिव्हिटी रेट 2.61 टक्के आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, देशाचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट 28 दिवसांपासून 3 टक्क्यांहून कमी झाला आहे. तर रिकव्हरी रेट 97.32 टक्क्यांवर पोहोचला आहे.