मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात 60 हजारांच्यावर नवीन कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. राज्यात आजही तब्बल 66 हजार 159 नवीन कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. दिलासायदायक म्हणजे आज नवीन 68 हजार 537 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 3799266 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 670301 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 83.69% झाले आहे.


राज्यात लॉकडाऊन वाढवला..
कोरोना साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. मात्र, तरीही रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. परिणामी राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. अनेक रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू होत आहे. ऑक्सिजन, औषधे, इंजेक्शन यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यात आणखी 15 दिवसांचा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.


'ब्रेक द चेन' अंतर्गत या नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. यामध्ये अनेक कठोर निर्बंध लागू करण्यात आले असून राज्यांतर्गत प्रवासासाठी ई पासची गरज लागणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र, फक्त अंत्यसंस्कार, मेडिकल इमर्जन्सी आणि अत्यावश्यक सेवेसाठीच प्रवास करता येणार, असल्याचंही जाहीर करण्यात आलं आहे. 


1 मे नंतर वयोगटानुसार लसीकरणावर सरकारचा भर 
18 ते 25 वयोगटात, 26 ते 35 वयोगट आणि 36 ते पुढील वयोगटातल्या लोकांना लसीकरण करता येण्याची शक्यता आहे.  त्यानंतर सध्या रजिस्ट्रेशनची जी पद्धत सुरु आहे तीच पद्धत ठेऊन जेवढ्या लस उपलब्ध आहेत. तेवढंच रजिट्रेशन झालेल्या नागरिकांना लस दिली जाईल. सध्या सगळ्यांकडे आरोग्य सेतू ॲप उपलब्ध आहे. त्या ॲपच्या माध्यमातून लसीकरण करता येईल का यावर देखील विचार सुरू आहे. मुंबईत वॉर्डमध्ये लसीकरण केंद्र सुरु होत आहेत. त्यामुळे जिल्हापातळीवर देखील असा उपक्रम राबवण्यावर भर आहे. सध्या इंजेक्शन, ऑक्सिजन आणि बेड्सचा तुटवडा असताना राज्यात लावलेला लॉकडाऊन या सर्व परिस्थितीत लसीकरणावर राज्य सरकारला भर द्यायचा आहे.