Maharashtra corona cases : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रकोप सुरुच आहे. आजही कोरोना रुग्णांचा आकडा 50 हजारांच्या वरच आला आहे. आज राज्यात 54,022 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर 37,386 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट 85.36  टक्क्यांवर पोहोचला आहे. काल राज्यात 62194 कोरोनाबाधीत रुग्णांची वाढ झाली होती तर 63842 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले होते. 


राज्यात आजपर्यंत एकूण 4265326 कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.  राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 85.36% एवढे झाले आहे. आज राज्यात आज 898 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा १.४९% एवढा आहे. 


आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,८९,३०,५८० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४९,९६,७५८ (१७.२७टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३८,४१,४३१ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर २८,८६० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.  राज्यात आज रोजी एकूण ६,५४,७८८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.  


मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी


सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या मुंबईत मात्र परिस्थिती खूप सकारात्मक आहे. मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असून मुंबईत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ही कोरोनाची लागण झालेल्यांपेक्षा जास्त आहे. मागील 24 तासांत मुंबई एकूण 3,039 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4,052 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. रिकव्हरी रेट 90 टक्के झाला आहे. शहरात 35224 कोरोना चाचणी करण्यात आल्या होत्या. दरम्यान, आज 71 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या मुंबईत 49 हजार 499 सक्रीय रुग्ण आहेत.


 राज्यात बालरोग तज्ज्ञांची टास्कफोर्स तयार करणार


कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक असणार असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्या अनुषंगाने राज्यात बालरोग तज्ज्ञांची टास्कफोर्स तयार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिली. कोरोनाची लागण लहान मुलांमध्ये होत असल्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास येत असून तिसऱ्या लाटेबाबत दिलेली पूर्वसूचना लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करण्यात येणार आहे.