मुंबई : कोरोना संसर्ग होऊन बाधित रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहेत. यातच मंगळवारी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या काहीशी वाढलेली दिसली. त्यामुळं प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांपुढच्या अडचणींमध्ये वाढताना दिसत आहेत. रविवार आणि सोमवारच्या तुलनेत महाराष्ट्रात मंगळवारी नव्या कोरोनाबाधितांचा आकडा काहीसा कमी दिसून आला. पण, 27,918 इतकी नव्या कोरोनाबाधितांची नोंदही धडकी भरवणारी ठरली. 


राज्याच्या आरोग्यविभागानं दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी कोरोनामुळं 139 जण दगावले. कोरोनातून सावरणाऱ्यांचा आकडाही राज्यात मोठा असला तरीही या दुसऱ्या लाटेमध्ये नवे रुग्ण आढळण्याचं प्रमाण मात्र अडचणीत आणणारं ठरत आहे. 


पुन्हा लॉकडाऊन झाल्यास बुडणाऱ्या रोजगाराची भरपाई सरकारने रोख रकमेद्वारे  लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावी- पृथ्वीराज चव्हाण  


आरोग्य विभागानं प्रसिद्ध केलेल्या माहिती पत्रकानुसार राज्यात मंगळवारी तब्बल 23,820 रुग्णांना रुग्णालयाचून रजा देण्यात आली. सध्या राज्याचा एकूण रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 85.71 टक्क्यांवर पोहोचलं आहे. 






कोरोना रुग्णांमध्ये होणारी ही वाढ पाहता, राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार का? हाच प्रश्न वारंवार उपस्थित केला जात आहे. ज्याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच लक्षवेधी वक्तव्य केलं. 'लॉकडाऊन सध्या कुणालाच नको आहे. पण परिस्थिती येते तेव्हा तहान लागल्यावर विहीर खोदू शकत नाही. लॉकडाऊन ऐनवेळी लावणे शक्य नाही, त्याचा अभ्यास करावा लागतो, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली', असं राजेश टोपे म्हणाले.


राज्यात कोरोनाची संख्या वाढते, याबाबत चिंता आहे. सर्व क्षेत्राचा अभ्यास करुन लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जातो. परिस्थितीवर नजर ठेवून निर्णय होतो. निर्बंध अधिक कडक करावे लागतात. लोकांकडून प्रतिसाद मिळत नाही, जनतेचा बिनधास्तपणा कोरोना रुग्णवाढीला कारणीभूत आहे, असंही राजेश टोपे यांनी म्हटलं.  


दरम्यान, महाराष्ट्र, कर्नाटक आणि पंजाब या राज्यांसह आठ राज्यांमध्ये कोरोना बाधित रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. एका दिवसात समोर आलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या आकडेवारीत 68 हजार 020 रुग्णांपैकी 84.5 टक्के रुग्ण या राज्यांमधील आहेत.