बीड : कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची बातमी दाखवून आम्ही घाबरवत नाहीत तर कोरोनाचे निर्बंध न पाळणाऱ्यांना भानावर आणण्यासाठी ही बातमी... कोरोनाचे निर्बंध पाळा हे अनेक वेळा सांगून सुद्धा लोक ऐकत नाहीत. शनिवार आणि रविवार म्हणजे काल आणि आज अंबाजोगाईमध्ये एकूण तीस जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.यातील 28 जणांना अग्निडाग तर दोन जणांचा दफनविधी करण्यात आला.  अंबाजोगाई नगरपालिकेकडून हे अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. रोज कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीतील हे छप्पर आता सुद्धा कमी पडू लागले.


मागच्या दोन आठवड्यापासून बीड जिल्ह्यामध्ये एक हजार पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. वाढणाऱ्या रुग्णांसोबत रूग्णांच्या मृत्यूचा आकडा सुद्धा वाढत आहे. काल आणि आज म्हणजे शनिवार व रविवार या दोनच दिवसात अंबाजोगाईत कोरोनामुळे मृत झालेल्या 30 रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. 28जणांना अग्निडाग तर दोन जणांचा दफनविधी करण्यात आला.  काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी एकाच सरणावर आठ जणांना अग्निडाग दिला होता का पुन्हा दिसणारे हे दृश्य थरकाप उडवणारे आहे..


बीड जिल्ह्यात सगळ्यात जास्त रुग्ण हे अंबाजोगाईमध्ये आहेत अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आणि लोखंडी सावरगावच्या कोबी हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांवर उपचार केले जात आहेत. एकट्या अंबाजोगाई तालुक्यात फक्त एप्रिल महिन्यात चार हजारांपेक्षा जास्त रुग्ण समोर आले आहेत. तर दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे.


 बीड जिल्ह्यात एकूण कोरोना रुग्णांच्या तुलनेमध्ये रुग्णांच्या मृत्यूचा आकडा पहिला लाटेपेक्षा कमी असल्याचे जाणवत आहे. बीड जिल्ह्यातील जवळपास पाच ते सहा तालुक्यातील रुग्ण हे अंबाजोगाई मध्ये दाखल झालेले असतात त्यामुळे स्वाभाविक आहे की जर मृत्यू अंबाजोगाई मधल्या हॉस्पिटलमध्ये झाला तर त्या रुग्णावर ती अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी ही अंबाजोगाई नगरपालिकेची असते.