मुंबई : राज्यात निर्बंध शिथिल केल्यानंतर काही दिवसांनंतर पुन्हा एकदा काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. राज्यात आज 9,812 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 8,752 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक 1551 रुग्ण आढळले. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा पुन्हा एकदा हॉटस्पॉटच्या मार्गावर असल्याचे दिसत आहे. तिसऱ्या लाटेचा धोका पाहता सोमवारपासून राज्यात नवीन निर्बंधांची घोषणा करण्यात आली आहे.
दुसऱ्या लाटेत पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग पसरला होता. या तीन्ही जिल्ह्यात रोज हजारच्या घरात नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद होत होती. शासनाने कडक निर्बंध लावल्यानंतर तीन्ही जिल्ह्याची दैनदिन रुग्णसंख्या हजारच्या आत आली होती. मात्र, आता पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. शनिवारी (26 जून) जिल्ह्यात 1551 नवीन बाधित आढळले आहेत तर 21 मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंता वाढल्या असून कडक निर्बंध लावले जाण्याची शक्यता आहे.
राज्यात पुन्हा रुग्णसंख्या वाढतेय
राज्यात पुन्हा रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. 9 हजारावर जरी आकडा दिसत असला तरी कालपेक्षा आज रुग्णसंख्येत वाढ झालीय. त्यामुळे प्रशासनाच्या चिंता वाढत आहेत. राज्यात आता बरे होणाऱ्यांची संख्या आता 57,81,551 इतकी झाली आहे. आज 179 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2 टक्के इतका झाला आहे. राज्यात सध्या 1,21,151 अॅक्टिव्ह केसेस आहेत.
राज्यात सोमवारपासून नवीन निर्बंध
राज्यामध्ये कोरोनाची आकडेवारी कमी झाल्यानंतर सरकारनं पाच टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिल केले होते. मात्र, निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर काही दिवसातच कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचं समोर येत आहे. सोबतच राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका देखील वाढू लागला आहे. त्यामुळं राज्य सरकारकडून आधीच्याच नियमावलीमध्ये नवीन बदल केले आहेत. आता राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात राज्य सरकारनं निर्णय जारी केला आहे.