मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुसते घोषणा करतात, पण त्या घोषणांची अंमलबजावणी होतंच नाही का? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे, कारण मुख्यमंत्र्यांच्या पोकळ आश्वासनाचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे.


एव्हरेस्ट सर करणारा पोलीस जवान रफिक शेख हे अजूनही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या मदतीच्या प्रतीक्षेत आहे. एव्हरेस्ट मोहिमेत हिमदंशामुळे तीन बोटं गमावावी लागली आहेत. त्याच परिस्थितीत रफिक शेख मंत्रालयाचे खेटे घालत आहेत.

या जवानाच्या एव्हरेस्ट मोहिमेचा सर्व खर्च देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी 7 जून 2016 रोजी रफिक यांचा सत्कार करताना केली होती. मात्र वर्ष होत आलं तरी रफिक शेख यांना शासनाकडून एक कवडीही मिळालेली नाही.



अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असलेल्या रफिक यांना एव्हरेस्ट मोहिमेसाठी 52 लाख रुपये खर्च आला होता. कर्ज काढून त्यांनी हा खर्च भागवला असून, आता कर्ज फेडण्यासाठी त्यांची धडपड सुरु  आहे.

दुसरीकडे रफिक मंत्रालयात सरकारी मदतीसाठी खेटे घालत आहेत. एव्हरेस्ट सर केला असला, तरी सरकारी मदतीच्या अवघड कडा सर करण्यात त्यांना अद्याप यश आलेलं नाही.

एव्हरेस्ट सर

19 मे 2016 मध्ये रफिक यांनी एव्हरेस्ट सर केला होता. पोलीस दल आणि मुख्यमंत्र्यांनी रफिक यांचा विशेष सन्मान केला होता. स्वतः मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात बोलवून रफिक यांचा सत्कार करत, त्यांच्या संपूर्ण मोहिमच्या खर्च राज्य सरकार उचलणार असं ट्विटदेखील केलं होतं

या घटनेला जवळ जवळ 11 महिने होऊनही अजूनही रफिक शेख यांना एकाही पैशाची मदत झालेली नाही.

धक्कादायक म्हणजे हिमदंश झाल्याने रफिक यांना उजव्या पायाची तीन बोट गमवावी लागली. उपचारांसाठी ते दोन महिने रुग्णालयात दाखल होते.

अशा परिस्थितीत रफिक मंत्रालयात खेटे घालत आहेत, निधी मिळण्यासाठी प्रयत्न करत आहे. रफिक सध्या औरंगाबाद पोलीस दलात पोलीस नाईक या पदावर कार्यरत आहे.