Nana Patole on Maharashtra Congress President: काँग्रेस (Congress) पक्षाचा महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चेनंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आता मौन सोडलं आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाचे अध्यक्ष बदलणार या अफवा असल्याचं पटोले यांनी स्पष्ट केलं आहे. गेल्या काही दिवसांत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बदलणार अशा चर्चा सुरू होत्या त्यावर शुक्रवारी (23 जून) रोजी नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'काँग्रेस हा भाजपाचा मुख्य शत्रू आहे, त्यामुळे मीडियाच्या माध्यमातून अशा अफवा पसरवल्या जात असल्याचं नाना पटोले यांनी यावेळी म्हटलं. तसेच 'प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा अंतिम निर्णय दिल्ली हाय कमांड घेतील', असेही पटोले यांनी सांगितलं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज धाराशिवमध्ये तुळजाभवानीचं देखील दर्शन घेतलं. त्यावेळी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.
नाना पटोलेंचे बानकुळेंना प्रत्युत्तर
'टीका करणारे पोपट असून पोपटाच्या टीकेला जास्त महत्व देण्याची गरज नाही ते काहीही बोलत असतात. त्यामुळे काँग्रेस आणि मी त्याला जास्त महत्व देत नाही', असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बावनकुळे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. 'बिहारच्या पाटण्यामध्ये विरोधी पक्षाची जी बैठक होत आहे. या बैठकीतले पक्ष त्या-त्या पक्षातील पुढच्या पिढीच्या भवितव्याच्या चिंतेतून ते एकत्र येत आहेत' अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या बैठकीवर केली होती. त्यावर प्रत्युत्तर नाना पटोले यांनी दिले आहे.
मुंबई काँग्रेसमध्ये बदल झाल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये देखील बदल होणार अशा चर्चा राज्यात सुरु होत्या. पण पटोलेंच्या वक्तव्यानंतर या चर्चांना आता पूर्णविराम मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान पक्षातील लोकांकडून देखील नाना पटोलेंवर नाराजी व्यक्त केली जात असल्याचं म्हटलं जात होतं. त्यामुळे पक्षातून नाना पटोलेंना हटवण्याचे प्रयत्न सुरु असल्याच्या चर्चा देखील चांगल्याच रंगल्या होत्या.परंतु आता पुढे देखील मीच अध्यक्ष राहिन अशी प्रतिक्रिया देत नाना पटोले यांनी या चर्चांना देखील पूर्णविराम दिला होता.
पाटणामध्ये आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांची बैठक बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आयोजित केली होती. या बैठकीवर भाजपकडून टीकास्त्र डागण्यात आलं. तर त्यावर देखील नाना पटोले यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली आहे.