मुंबई : शिवसेना प्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्री पदावरुन  खाली खेचलं, त्यांना ते पुण्य मिळू दे असं सांगत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री म्हणून शिवसेनाप्रमुखांचे शेवटचे भाषण ठरले.  उद्यापासून आपण पुन्हा शिवसेनेच्या भवनमध्ये बसणार आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा त्याग केला. जाणून घेऊया मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शेवटच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे 


शिवसैनिकांनी  कोणताही गोंधळ घालू नये


न्यायदेवतेचा निकाल हा मानला पाहिजे.  लोकशाहीचा मान राखल्याबद्दल राज्यपालांचे धन्यवाद.  उद्या कोणीही शिवसैनिकांनी त्यांच्या मार्गात येऊ नका. कुठलाही गोंधळ घालू नये. या उद्या, आमदारांच्या मार्गात कोणीही येणार नाही. 


एक माणूस विरोधात असेल तर ते माझ्यासाठी लज्जास्पद


माझ्या विरोधात किती लोक याने मला फरक पडत नाही. कुणाकडे किती बहुमत यात मला रस नाही. माझा एक माणुस विरोधात असेल तर ते माझ्यासाठी लज्जास्पद.


शिवसेनाप्रमुखांच्या पुत्राला पदावरुन खाली खेचण्याचे पुण्य त्यांच्या पदरात पडू द्या


 शिवसेनेने  ज्यांना राजकीय जन्म दिला, शिवसेनाप्रमुखांनी मोठ केलं, शिवसैनिकांनी मोठ केलं त्यांच्या पदरात शिवसेनाप्रमुखांच्या पुत्राला पदावरुन खाली खेचण्याच पुण्य त्यांच्या पदरात पडू द्या.


मुख्यमंत्री पदाचा त्याग करत आहे


आज मी मुख्यमंत्री पदाचा त्याग करत आहे. शिवसैनिकांनो त्यांना शिवसेनाप्रमुखांच्या मुलाला सत्तेवरुन खाली खेचलं याचे पेढे खाऊ द्या, वाटु द्या, त्याचा गोडवा त्यांना लखलाभ. मला शिवसैनिकांच्या आशीर्वादाचा गोडवा हवा, त्यात मला आनंद आहे.


शांतता राखण्याचे आवाहन


देशात अनेक ठिकाणी दंगली झाल्या, परंतु महाराष्ट्रात शांतता राहिली. त्याचे कारण तुम्हीं सर्व बंधु-भगिनी माझ ऐकत होता. 


पुढची वाट सगळ्यांच्या आशीर्वादाने सुरू राहिल 


जनतेच्या आशिर्वादाने अनेक काम केली आहे . शेतकऱ्यांसाठी अनेक निर्णय घेतले आहे. पुढची वाट सगळ्यांच्या आशीर्वादाने सुरू राहणार आहे


चांगल्या गोष्टीला दृष्ट लागते


एखागी गोष्ट चांगली सुरू असेल तर त्याला दृष्ट लागले. कोणाची नजर लागली हे सर्वांना माहित आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी यांचे खास आभार. जनतेच्या आशीर्वादाने चांगल काम करु शकलो. मी आपल्याशी आज मनापासून बोलतोय आणि नेहमीच मनापासूनच बोलत आलोय. 


 बाळासाहेबांनी ज्यांना मोठे  केले ते विसरले


 ज्यांना सत्ता आल्यावर जे जे शक्य होत ते दिले ते लोक नाराज झाले.  साधी साधी माणसं ज्यांना काही दिल नाही ते हिंमतीने सोबत आहेत. याला म्हणतात माणुसकी, याला म्हणतात शिवसैनिक. याच नात्याच्या जोरावर अनेक आवाहन शिवसेना परतवीत आली आहे. बाळासाहेबांनी माणसांना मोठ केलं. मोठे झाल्यावर माणस विसरली.