Eknath Shinde: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याचा निषेध करत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केलेय आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले की, 'छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही. मागील चार महिन्यापासून बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचं शिवसेना आणि भाजपचं सरकार चांगलं काम करत आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालील वाळू सरकली आहे. त्यांना धडकी भरली आहे. त्यामुळेच हे सर्व प्रकार पुढे येत आहेत. '
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांसोबत सत्ते राहू नये, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार कुणाला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि हिंदुत्व मोडून तोडून टाखणाऱ्यांना अधिकार आहे का? त्यांना आमच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही. सत्तेच्या खुर्चीसाठी तुम्ही बाळासाहेबांचे आणि हिंदुत्वाचे विचार सोडले, तुम्ही तडजोड केली. त्यांनी आम्हाला शिकवू नये. महाराष्ट्रातील एक इंच जागाही जाऊ देणार नाही, तसेच जत तालुक्यातील गावातील अडचणी सोडवू, असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
महाराष्ट्रातील एकही गाव बाहेर जाणार नाही. आमचा सीमा भाग आम्हाला परत मिळेल, असे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. बेळगाव, निपाणी आणि कारवार हा आमचा भाग आहे. ही आमची भूमिका आहे. आमची ही भूमिका आम्ही न्यायालयात माडंली आहे. कायद्याच्या चौकटीत आम्ही मागणी केली आहे. परंतु,यात कोणीही राजकारण आणू नये. या पूर्वी सर्वात जास्त काळ कर्नाटक आणि महाराष्ट्रात देखील काँग्रेस आणि मित्र पक्षांचं सरकार होतं. परंतु, त्यांच्याकडून हा प्रश्न सुटला नाही. आम्ही हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. सीमा प्रश्नावरून कोणीही राजकारण करू नये, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?
वृद्धाश्रमातही जागा नसलेल्या मंडळींना राज्यपाल म्हणून का पाठवता, या शब्दांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची खिल्ली उडवून उद्धव ठाकरे यांनी कोश्यारींना तातडीनं राज्यपालपदावरून हटवण्याची मागणी केली. शिवसेना ठाकरे गटाच्या पक्षप्रमुखांनी त्यांच्या मातोश्री निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत ही मागणी केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी त्या दोघांचाही समाचार घेतला. कोश्यारी यांनी महाराष्ट्रातल्या थोर व्यक्तिमत्त्वांचा सातत्यानं अपमान केला आहे, याकडे त्यांनी राज्याचं लक्ष वेधलं. कोश्यारी यांनी शिवछत्रपतींविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधासाठी त्यांनी भाजपसह सर्व पक्षातल्या महाराष्ट्रप्रेमींना एकत्र येण्याचं आवाहन केलं. तसंच या मुद्द्यावर शांततापूर्ण महाराष्ट्र बंदची हाक देण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या पक्षप्रमुखांनी या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि भाजपच्या महाराष्ट्रातल्या कथित धोरणांचा आपल्या शैलीत समाचार घेतला.