मुंबई : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (CM Eknath Shinde and Devendra Fadanvis) यांनी 30 जूनला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांनी शपथ घेऊन 20 दिवस उलटले तरीही अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मात्र मंत्रिमंडळात कोण असेल याची उत्सुकता सर्वांनाच आहे. त्यामध्ये शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात छोट्या पक्षांच्या आमदारांना आणि अपक्षांना संधी मिळणार असल्याची माहिती मिळतेय. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नक्की सर्वांना सरप्राईज मिळेल असं देखील एका कार्यक्रमात म्हटलं आहे.


सर्व मित्र पक्षांना सत्तेचा मिळणार वाटा 
शिंदे-फडणवीस सरकारला ज्यांनी ज्यांनी सरकार स्थापनेत मदत केली त्या सर्व छोट्या पक्षांतील आमदारांना मंत्रिमंडळाचा भाग करून घेणार असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. त्यामुळे छोट्या पक्षांच्या आमदारांना लवकरच होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात वाटा मिळू शकतो .


शिंदे-फडणवीस सरकारला कोणत्या छोट्या पक्षांनी व अपक्ष आमदारांनी मदत केली?
बहुजन विकास आघाडी ,प्रहार जनशक्ती पक्ष ,मनसे, जनसुराज्य शक्ती आणि इतर छोटे पक्ष व अपक्ष आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला मदत केली. बच्चू कडू ,राजकुमार पटेल, राजेंद्र यड्रावकर, चंद्रकांत पाटील, नरेंद्र भोंडेकर, किशोर जोरगेवार,मंजुळा गावित, विनोद अग्रवाल, गीता जैन, आशिष जायसवाल, विनय कोरे यांनी पाठींबा दिला आहे. त्यामुळे शिंदे फडणवीस या आमदारांना मंत्रीपदाची किंवा महामंडळाचे सरप्राईज देण्याची शक्यता आहे.


महाविकास आघाडीने केलं ते शिंदे-फडणवीस करणार नाहीत 
घटक पक्षांकडे केलेले दुर्लक्षच महाविकास आघाडीला महागात पडलं याची पूर्ण खात्री भाजपला आहे. त्यामुळे या सरकारमधील मंत्रिमंडळ विस्तारात या घटक पक्ष आणि अपक्ष आमदारांना सामावून घेतले जाणार हे नक्की आहे. अन्यथा पक्ष आणि अपक्ष आमदारांच्या नाराजीला सामोरे जावे लागेल.


लवकरच सरप्राइज मिळणार 
काही दिवसातच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यामध्ये शिवसेना आणि भाजप पक्षातील प्रत्येकी आठ मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या सत्रात मित्र पक्षांना देखील मंत्रिमंडळाचा भाग केला जाईल अशी माहिती मिळते तसेच उरलेले अपक्ष आणि मित्रपक्ष यांना महामंडळ देऊन जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम शिंदे-फडणवीस सरकार करणार असल्याची माहिती मिळते. त्यामुळे आता पुढील काळात मित्र पक्षांना शिंदे-फडणवीस सरकार काय सरप्राईज देतं हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.