मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज नाशिकमध्ये करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी या समारोपाला आज उपस्थित होते. गेल्या पाच वर्षातील सरकारच्या कामाचा राज्यातील जनतेला हिशेब देण्यासाठी ही यात्रा असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा सांगितलं. 1 ऑगस्टपासून सुरु झालेली ही यात्रा या ना त्या कारणाने सतत चर्चेत आहे.
1. महाराष्ट्रात पहिल्यांदाच विद्यमान मुख्यमंत्र्याचा चेहरा घेऊन प्रचार यात्रा-
महाराष्ट्रात अनेक लोकप्रिय मुख्यमंत्री झाले. मात्र, निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यांचा चेहरा घेऊन प्रचार यात्रा झाल्या नाहीत. खासकरून, भाजपनं देशपातळीला जरी निवडणुकीपूर्वी पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर केले असले, तरी राज्यांमध्ये नेहमीच निवडणुकीनंतरचा कल, सहकारी पक्ष यांची समीकरणं सोडवून मगच मुख्यमंत्री जाहीर झाले. महाराष्ट्रातल्या राजकाणाची ढब पाहता देवेंद्र फडणवीसांचा चेहरा मुख्यमंत्रीपदासाठी प्रॉजेक्ट करणं हे भाजपचं धाडसंच म्हणावं लागेल.
2. महाजनादेश यात्रा भाजप सरकारसाठी की फक्त फडणवीसांसाठी...
मुख्यमंत्र्याचा चेहरा आणि फक्त मुख्यमंत्र्यांचाच चेहरा हे या यात्रेचं दुसरं वैशिष्ट्य होय. या यात्रेत भाजपच्या अन्य नेत्यांचा सहभाग बेतास बात राहिला. बीडमध्ये यात्रेच्या रथावर विनायक मेटे येण्यावरून पंकजा मुंडेंची नाराजी लपून राहिली नाही. यात्रेत नेहमी देवेंद्र फडणवीसांचेच भाषण महत्वाचे ठरत असे.
3. शिवसेना, राष्ट्रवादीच्या यात्रा झाकोळल्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या या 'महाजनादेश' यात्रेला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादीकडून 'शिवस्वराज्य यात्रा' सुरू करण्यात आली. खासदार अमोल कोल्हे आणि उदयनराजे भोसले त्याचा चेहरा असणार होते. मात्र, या यात्रेचा फारसा प्रभाव पडला नाही. उलट, उदयनराजे यांनीच आता भाजपात प्रवेश केलाय. दुसरीकडे, शिवसेनेने आदित्य ठाकरेंना महाराष्ट्रासमोर आणण्यासाठी 'जनआशिर्वाद यात्रा' सुरू केली. यात्रेचं आयोजन नेटकं झालं तरी 'महाजनादेश'मुळे ती ही झाकोळली गेली.
4. मुख्यमंत्र्यांचा हायटेक रथ
मुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेसाठी तयार करुन घेण्यात आलेला रथ या यात्रेचं विशेष आकर्षण ठरला. या रथामध्ये एका खास लिफ्टची सोय करण्यात आली होती. या लिफ्टचा वापर करुन मुख्यमंत्री रथाच्या वर येत लोकांना नमस्कार करत होते.
5. महाजनादेश यात्रेदरम्यानचे पक्षप्रवेश
गेल्या काही महिन्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक मोठे नेत्यांनी भाजप-शिवसेनेची वाट धरल्याचं पाहायला मिळालं. महाजनादेश यात्रेदरम्यानही यापैकी अनेक मोठ्या नेत्यांचे भाजपमध्ये प्रवेश केला. महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा शेवट 1 सप्टेंबरला सोलापुरात झाला. तेव्हा सोलापुरातील कार्यक्रमात राणा जगजितसिंह पाटील, पद्मसिंह पाटील, जयकुमार गोरे आणि धनंजय महाडिक यांनी अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
6. सांगली-कोल्हापुरातील महापूर
मुख्यमंत्र्याची महाजनादेश यात्रा सुरु झाल्यानंतर काही दिवसातच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगलीमध्ये भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. राज्यात अशा प्रकारे पूरपरिस्थिती असताना मुख्यमंत्री यात्रा करत असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली होती. 6 ऑगस्टला मुख्यमंत्री महाजनादेश यात्रा अर्ध्यात सोडून मुंबईत परतले होते. त्यानंतर यात्रेचा पहिला टप्पा स्थगित करण्यात आला होता.
7. ग्रामीण महाराष्ट्राशी कनेक्ट
भारतीय जनता पक्ष हा फक्त शहरी लोकांचा पक्ष असल्याची टीका विरोधकांकडून बऱ्याचदा करण्यात येते. मुख्यमंत्र्याची महाजनादेश भाजपची ही प्रतिमा पुसुन ग्रामीण महाराष्ट्राशी आणखी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करणारी दिसुन आली. यात्रेदरम्यान राज्यातील ग्रामीण भागातून मुख्यमंत्र्यांनी प्रवास केला आणि अनेक गावांना भेटी दिल्या.
8. महाजनादेश यात्रेदरम्यानची निषेध, आंदोलनं
मुख्यमंत्र्याची महाजनादेश यात्रा सुरु असताना वेगवेगळ्या कारणांंनी विरोधीपक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले. सांगलीमध्ये महाजनादेश यात्रेच्या रथावर कोंबड्या आणि अंडी फेकण्यात आली, नाशिकमध्ये हवेत काळे फुगे सोडण्यात आले, अनेक ठिकाणी विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांची यात्रा समोर असताना विरोधात घोषणा देतानाचे व्हिडीओ व्हायरल केले.
9. निवडणुकीपूर्वी वातावरण निर्मिती-
'महाजनादेश यात्रे'मुळे ढवळून निघालेल्या राजकीय वातावरणाचा परिणामही विविध नेत्यांच्या पक्षांतराच्या रूपानं दिसला. निवणूका जाहीर होण्यापूर्वी आणि उमेदवार ठरलेले नसताना तर भाजपची इतकी तयारी असेल तर प्रत्यक्ष युद्धाला तोंड फुटल्यावर फडणवीस प्रचाराचा गाडा कसा हाकणार याकडे आता लक्ष असणार आहे.
10. लोकांचा प्रतिसाद
या यात्रेला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. रस्त्याच्या दुतर्फा जमलेले लोक मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत होते. मुख्यमंत्र्यांच्या भाषणालाही लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा 'या' दहा कारणांमुळे राहिली चर्चेत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Sep 2019 06:42 PM (IST)
1 ऑगस्टपासून सुरु झालेली ही मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा या ना त्या कारणाने सतत चर्चेत आहे. त्यापैकी हा खास दहा कारणं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -