हिंगोली : मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा रणशिंग फुंकताना आज (6 जुलै) हिंगोलीमधून निर्णायक इशारा दिला आहे. येत्या 13 तारखेपर्यंत आरक्षण न दिल्यास आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये 288 पैकी एकही उमेदवार निवडून येऊ देणार नाही, असा थेट इशारा जरांगे पाटील यांनी दिला.कोणत्याही परिस्थितीत सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, अशी मागणी पाटील यांनी आज हिंगोलीतील विराट सभेतून केली. 


छगन भुजबळ यांचं ऐकून मराठ्यांना त्रास देणार आहात का?


मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यातून शांतता यात्रा सुरू करताना मराठा आरक्षणासाठी जनजागृती सुरू केली आहे. आजच्या भाषणांमधून पाटील यांनी पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर घणाघाती प्रहार केला. छगन भुजबळ यांचं ऐकून मराठ्यांना त्रास देणार आहात का? अशी विचारणा त्यांनी केली. 


मराठ्यांच्या नादी लागल्यास कार्यक्रम केला जाईल


ते म्हणाले की महाराष्ट्र हा छगन भुजबळांची मक्तेदारी नाही. 288 पैकी एकही उमेदवार निवडून येऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी, राज्य सरकारने आक्रोश समजावून घ्यावा कोपऱ्या कोपऱ्यात भगवं वादळ दिसत असल्याचे ते म्हणाले. मराठ्यांच्या नादी लागल्यास कार्यक्रम केला जाईल.


आतापर्यंत 57 लाख नोंदी सापडल्या


आतापर्यंत 57 लाख नोंदी सापडल्या असून दीड कोटी आरक्षणांमध्ये ते गेलं आहे. त्यामुळे सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिली पाहिजे. ते म्हणाले की, 16 टक्के आरक्षण टिकू दिले गेलं नाही. मराठ्यांचं आरक्षण खरं असूनही टिकू दिलं गेलं नाही. 10 टक्के आरक्षण दिलं. मात्र, त्याच्या अगोदरच कोर्टामध्ये आव्हान देण्यात आले. त्यामुळे 57 लाख नोंदी भुजबळने रद्द करण्याची मागणी केली, अशी टीका त्यांनी केली. 


आरक्षणाच्या आडून राज्यातील सर्व ओबीसी नेते एकत्र 


ते म्हणाले की कोणावरती अन्याय करू नका आणि सहन सुद्धा करू नका. आरक्षणाच्या आडून राज्यातील सर्व ओबीसी नेते एकत्र आले आहेत. मराठा समाज चारी बाजूने घेरला गेला आहे. त्यामुळे समाजाची ताकद दाखवण्याची हीच वेळ आहे. त्यामुळे सर्वपक्षीय आमदार, मंत्र्यांनी समाजाच्या पाठीशी राहावे. एकही मराठ्याची नोंद रद्द होऊ नये अशी विनंती मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणातून केली. 


बीडमधील मराठ्यांनी एकजुटीने मतदान केल्याने त्यांना त्रास 


बीडमधील मराठ्यांनी एकजुटीने मतदान केल्याने त्यांना त्रास होत असल्याची टीका पाटील यांनी केली. समाज एकत्र आल्याने त्यांच्या पोटात दुखत आहे. मराठा आरक्षणाची किंमत समाजाला कळू लागली आहे असेही ते म्हणाले. 


मला सातत्याने उघडं पाडण्याचा प्रयत्न केला 


सरकारने मला सातत्याने उघडं पाडण्याचा प्रयत्न केला मात्र मला उघड पडू देऊ नका असा आवाहन त्यांनी यावेळी समाजासमोर बोलताना केले. मला तुमच्या पाठबळाची आणि आशीर्वादाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मला एकटं करायचं ठरवलं आहे. त्यामुळे मराठ्यांची लोक फोडून पत्रकार परिषद घ्यायला लावल्या जात असल्याची टीका सुद्धा त्यांनी केली. बदनामी होण्यासारखं माझ्याजवळ काहीच नसल्याचे जरांगे पाटील म्हणाले. 


ज्या नोंदी सापडल्या आहेत त्या भुजबळांसारख्या डुप्लिकेट नाहीत


गोरगरीब लेकरांसाठी मी लढत आहे. तुमचे कोणते पद नको, पैसा नको आम्ही समाज मोठा करायला निघालो असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. पाटील यांनी मराठा आरक्षणासह ब्राह्मण, मुस्लीम आणि कैकाडी समाजाच्या उल्लेख केला. ब्राह्मण लोहार समाजाला सुद्धा  आरक्षण मिळालं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. ज्या नोंदी सापडल्या आहेत त्या भुजबळांसारख्या डुप्लिकेट नाहीत अशी टीका त्यांनी केली. जर आपल्याला आरक्षण दिलं नाही गेले तर राज्यातील मराठ्यांची बैठक घेऊन 288 निवडून द्यायचे की पाडायचे ते ठरवू यावेळेस ठरलं तर पाडायचं, तर पाडू असं जरांगे पाटील म्हणाले. 


जो ओबीसी नेता  मराठ्यांना त्रास देईल त्यांना पाडायचे म्हणजे पाडायचे असेही ते म्हणाले. ओबीसी नेता कितीही ताकदीने उभा राहू द्या त्याला पाडायचे म्हणजे पाडायचं. त्यांची जिरवणार म्हणजे जिरवणार, असा इशारा त्यांनी दिला. 


इतर महत्वाच्या बातम्या