चंद्रपूर : राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या भागांमध्ये उष्णतेचा कहर सुरु आहे. मार्च महिन्यात दोन वेळा उष्णतेची लाट आली. पण एप्रिल महिन्यातही नागरिकांची उन्हापासून सुटका होणार नाही असे चित्र दिसत आहे. कारण चंद्रपूर जिल्हात या वर्षी पहिल्यांदाच 44 अंशाच्यावर तापमानाची नोंद झाली असून गेल्या 50 वर्षात मार्च महिन्यात सर्वात उच्चांकी तापमानाची प्रथमच नोंद झाली आहे


चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसात उष्णतेच्या दोन लाटा धडकल्याने नागरिकांची लाही लाही होत आहे. यामुळे दुपारच्या वेळेस चंद्रपुरातील रस्ते निर्मनुष्य होत आहेत. तापमानाचा पारा नवीन उच्चांक गाठत असल्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यात काय होणार असा विचार करून लोकांची चिंता वाढली आहे. मात्र डॉक्टरांनी याबाबत लोकांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.  उन्हात बाहेर निघण्याचं टाळावे, शरीराला पाण्याची कमी होऊ देऊ नये, खूप पाणी प्यावे, त्यासाठी ज्यूस, नारळपाणी, ताक यासारखे पदार्थ घ्यावे.


येत्या महिन्यात महाराष्ट्रातील कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, उत्तर कोकण, मराठवाड्यातील काही जिल्हे एप्रिलमध्ये अधिक तापणार आहेत. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली भागात तापमान सरासरी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 


मार्च महिन्यात अकोल्यात सर्वाधिक तापमान


राज्यातील सर्वाधिक तापमान असणारे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोला जिल्ह्यात मार्च महिन्यातच 42 अंश सेल्सिअस' तापमान पोहोचलं आहे. दरम्यान, अकोला जिल्ह्याने जगभरातील पहिल्या दहा उष्ण शहरांमध्ये स्थान मिळवलं आहे.


2-3 दिवसात कमाल तापमानात सरासरीपेक्षा अधिक वाढ 


दरम्यान पुढील काही दिवसात महाराष्ट्रातील तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढणार आहे. पुढील 2 ते 3 दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही ठिकाणी तर विदर्भात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कमाल तापमानात सरासरीपेक्षा अधिक वाढ होणार आहे. अहमदनगर, जळगावमध्ये उष्णतेच्या लाटेच्या अंदाजासोबतच सोलापूर, जालना, परभणी आणि हिंगोलीत देखील उष्मघाताची शक्यता आहे. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha