मुंबई : या आठवड्यातील मंगळवारची मंत्रिमंडळाची बैठक चांगलीच वाद आणि खडाजंगीने गाजलेली पाहायला मिळाली. राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातला वाद असेल किंवा दोन सचिवांमधला वादही मंत्रीमंडळाच्या बैठकीतून चव्हाट्यावरती आलेला पाहायला मिळाला.
मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक (Maharashtra Cabinet Meeting) पार पडली. या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. मात्र मोठ्या निर्णयाच्या ऐवजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेले वादच जास्त चर्चेत राहताना पाहायला मिळाले. अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एक फाईल सहीसाठी पाठवली आणि त्यातून वादाला सुरुवात झाली. फाईल वाचण्यासाठी किमान वेळ द्यावा असं अजित पवारांनी म्हटलं.
त्यावर मुख्यमंत्र्यांनीही मी याच ठिकाणी बसून तुमच्या अनेक फाईल वरती सह्या केलेल्या आहे, त्यावेळी फाईल मी वाचली नाही असं प्रत्युत्तर दिलं. त्यावर अजित पवार यांचा थोडा पारा चढला. तुम्हाला सह्या करायच्या असेल तर करा असं ते म्हणाले. त्यानंतर काही प्रमाणात तणाव झाल्याचं मंत्रीमंडळ बैठकीत पाहायला मिळाला. यातच शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंतही काही प्रमाणात आक्रमक झाले.
कृषिखात्याच्या प्रस्तावावर फुली
या वादाच्या सोबतच कृषी विभागाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. कृषी विभागाच्या सचिव व्ही राधा यांची तडकाफडकी बदली केल्याने या विभागाचा पीकपाणी प्रस्ताव सचिवांनी मांडण्याऐवजी थेट कृषिमंत्र्यांनी मांडला. सचिव कुठे आहेत असं विचारलं. त्यांची बदली करुन पदभार काढल्याची माहिती मुख्य सचिवांनी मुख्यमंत्र्यांना दिली. यावर मुख्यमंत्री यांनी नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात नॅनो युरियाचा दोनदा प्रस्ताव नाकारल्याने कृषिमंत्री धनंजय मुंडेही मंत्रिमंडळाच्या बैठकीत संतप्त होताना पाहायला मिळाले.
दरम्यान महिला व बालकल्याण विभागाचे प्रधान सचिव अनुप यादव आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन यांच्यातही चांगलीच खडाजंगी झाली. लाडकी बहीण योजनेसाठी 27 लाख पात्र महिला लाभार्थ्यांचे बँक खातं आधारशी जोडलं नसल्याची माहिती मंत्रिमंडळाला दिली.
दोन सचिवांमध्येही वाद
ही त्रुटी कशाप्रकारे दूर करता येईल याची माहिती यादव यांनी मंत्रिमंडळाला देत असताना जैन यांनी काही सूचना देण्याचा प्रयत्न केला. त्यावर नाराज झालेले यादव यांनी आपल्या विभागात ढवळाढवळ नको असं सांगत जैन यांना समज दिली. हा वाद मुख्यमंत्र्यांच्या समोर झाल्याने या मंत्राच्या बैठकीत सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनुप यादव यांना समज देत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती महायुती सरकारने अनेक घोषणा केलेल्या आहेत. मात्र राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट असताना प्रत्येक मंत्री आपली योजना पूर्ण करण्यासाठी आटापिटा करत आहे. त्यातून या वादाची ठिणगी पडताना पाहायला मिळते. सोबतच महायुतीमध्ये तीन पक्ष असल्याने एकमेकांवरती कुरघोडी होताना पाहायला मिळते. निधींना ब्रेक, योजनांना ब्रेक जशी आरोप प्रत्यारोप महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना होताना पाहायला मिळत हेते. तेच आरोप आता महायुती सरकारमध्येही होताना पाहायला मिळत आहेत.
ही बातमी वाचा: