मुंबई: राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर आता राज्य सरकारचे खातेवाटप पूर्ण झालं आहे. अजित पवार यांना अर्थ खातं तर त्यांच्या इतर सहकाऱ्यांना वजनदार खाती मिळाली आहेत. अशात खातं वाटप झालं, आता मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार असा प्रश्न विचारला जातोय. आपल्याला मंत्रिपद मिळणार अशी रोजच वाट पाहणाऱ्या संजय शिरसाठ, भरत गोगावले आणि बच्चू कडूंची इच्छा कधी पूर्ण होणार याकडे लक्ष लागलं आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस कानामागून आली आणि तिखट झाली अशी काहीशी प्रतिक्रिया शिंदे गटाच्या आमदारांची झाली असेल. कारण गेल्या वर्षभरापासून आपण मंत्री होणार अशी आशा लावून बसलेल्या शिंदे गटाच्या आमदारांना, त्यांना लक्षातही येऊ न देता राष्ट्रवादीने शह दिल्याचा प्रकार घडला आहे. राज्य सरकारकडे बहुमत असतानाही अजित पवारांच्या राष्ट्रवादीने शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. नुसता निर्णयच घेतला नाही तर जागेवरच मंत्रिपदाचा शपथविधीही कार्यक्रम पार पाडला. 


अजित पवार सत्तेत आल्यामुळे सरकार अधिक भक्कम झालं हे खरं असले तरीही त्यामुळे शिंदे गटामध्ये काहीशी अस्वस्थता असल्याचं दिसून येतंय. एक तर शिंदे गटाला अंधारात ठेऊन भाजपने अजित पवारांना सत्तेत घेतलं. आता तर खातेवाटपानंतर भाजप शिंदे गटापेक्षा अजित पवार गटावरच जास्त मेहेरबान असल्याचं दिसून येतंय.  


महाविकास आघाडीमध्ये असताना अजित पवारांच्या अर्थखात्याने शिवसेनेला निधी दिला नाही अशी तक्रार करत शिवसेनेच्या 50 आमदारांनी सवतासुभा मांडला आणि भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. यातून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळालं पण त्या व्यतिरिक्त त्यांच्या इतर सहकाऱ्यांना मात्र म्हणावी तितकी चांगली खाती मिळाली नसल्याची चर्चा होती. 


गोगावले, बच्चू कडू आणि शिरसाठांचे काय?


गेल्या वर्षभरापासून मंत्रिमंडळ विस्ताराचं भिजतं घोंगडं असल्याचं चित्र होतं. त्यातून शिंदे गटाचे अनेक आमदार घोड्यावर बसून आहेत, आपण उद्याच मंत्री होणार असा दावा त्यांच्याकडून रोजच करण्यात येत होता. त्यामध्ये सर्वात पुढे नाव होतं ते भरत गोगावले, संजय शिरसाठ आणि बच्चू कडू. भरत गोगावले आणि संजय शिरसाठ यांनी तर आपण पालकमंत्रीही होणार असल्याची दवंडी पिटवली होती. पण टुमारो नेव्हर डाईज सारखा उद्या अजून उजाडलेला नाहीय. 


पण त्यांच्या आधीच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने सत्तेत सामील होत मलईदार मंत्रिपदांचा जागेवरच कंडका पाडला आणि नऊ कॅबिनेट मंत्रीही पदरात पाडून घेतली. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्थ खातं, सहकार खातं आणि कृषी खातं. भाजपकडील अर्थ खातं हे अजित पवारांकडे गेलं, सहकार खातं हे दिलीप वळसे पाटलांकडे गेलंल आणि शिवसेना शिंदे गटाकडील कृषी खात्यावर आता धनंजय मुंडेंचा कारभार चालणार आहे. 


मग गेल्या वर्षभरापासून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या शिंदे गटाच्या गोगावले, शिरसाठ आणि प्रहारचे आमदार बच्चू कडूंचे काय होणार असा सवाल आता विचारला जात आहे. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांना सर्वप्रथम साथ देणाऱ्या शिरसाठ आणि गोगावले यांना मंत्रिपदासाठी कायमच इच्छुकांच्या यादीत स्थान मिळालंय. एकनाथ शिंदे यांना नंतर पाठिंबा दिलेल्या आमदारांना पहिल्या टप्प्यामध्ये स्थान स्थान मिळालं. पण या तिघांचं घोडं काही इच्छुकांच्या यादीपलीकडे जात नाही.


बच्चू कडू यांनी तर आपण मंत्रिपदाचा दावा सोडूनच टाकल्याचं जाहीर केलं होतं. आता अजित पवारांकडेच अर्थ खातं गेल्यानंतर शिंदे गटामध्ये अस्वस्थता तर आहेच, पण आपल्याला दिल्या गेलेल्या शब्दाचं काय? असा सवालही या गोगावले, शिरसाठ आणि बच्चू कडू यांच्यासोबत शिंदे गटाच्या आमदारांना पडला असेल हे नक्की. 


ही बातमी वाचा: