Bharat Gogawale On Cabinet Expansion : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराची (Maharashtra Cabinet Expansion) जोरदार चर्चा आहे. शिंदे-ठाकरे गटाच्या न्यायालयात सुरु असलेल्या वादावर आलेल्या निकालानंतर मंत्रिमंडळाची चर्चा अधिक पाहायला मिळत आहे. अशातच शिवसेनेचे नेते (शिंदे गट) भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी सूचक वक्तव्य केले आहे. पुढील आठ दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असल्याचं सूचक वक्तव्य गोगावले यांनी केले आहेत. तर यासाठी कपडेही तयार ठेवले असल्याचं गोगावले म्हणाले आहेत.
दरम्यान मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना भरत गोगावले म्हणाले की, विस्ताराची वेळ जवळजवळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांच्या आत रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असल्याचं आम्हाला वाटत आहे. तर रायगडावर होणाऱ्या राज्याभिषेक सोहळ्याच्या आधी जर मंत्रिमंडळ विस्तार झाला तर या कार्यक्रमासाठी पालकमंत्री पदाचा बहुमानही मिळणार असल्याचं गोगावले म्हणाले. त्यामुळे राज्याभिषेक सोहळ्याच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. जे काही कॅबिनेट मंत्रीपद आहेत, त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे काही बोलतील त्याप्रमाणे घेऊ. तर जे काही मंत्रीपदाचं भार दिला जाईल तो सांभाळेल असेही गोगावले म्हणाले. तर यासाठी नवीन कपडे देखील शिवलेले असल्याचं गोगावले म्हणाले.
भाजप-शिवसेनेच्या सर्वच आमदारांना मंत्रिमंडळ विस्ताराची अपेक्षा
दरम्यान मंत्रिमंडळ विस्ताराबाबत संजय शिरसाट यांची देखील प्रतिक्रिया दिली आहे. भरत गोगावले यांनी नवीन कपडे शिवले असतील की नाही, याची मला काही माहिती नाही. पण जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घोषणा करतील आणि ज्यांचं यादीत नावं असतील तेच खरं मंत्रिमंडळ विस्तार असणार आहे. त्यामुळे मी कोणताही नवीन ड्रेस घेतला नसून, मला आहे तो ड्रेस देखील चालतो. भाजप आणि शिवसेनेच्या सर्वच आमदारांना मंत्रिमंडळ विस्ताराची अपेक्षा असून, त्यात गैर काहीच नाही. पण याची खरी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच करतील. त्यामुळे आम्हाला काय वाटते यापेक्षा त्यांच्या मनामध्ये काय आहे हे महत्वाचे आहे. तर ते सांगितल तीच तारीख मंत्रिमंडळ विस्ताराची असणार आहे. तसेच मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याने जर कोणी आमदार नाराज झाला, तरी त्याला कुठे नं कुठे सामवून घेतले जाते. त्यांना वाऱ्यावर सोडले जात नाही, असेही संजय शिरसाट म्हणाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या: