मुंबई: पोलीस दलावर आपला अभिमान असल्याचं एकीकडे सांगायचे आणि दुसरीकडे त्यांच्यावर अविश्वास दाखवत प्रत्येक केस ही सीबीआयकेडे द्यायची मागणी करायची हे बरोबर नसल्याचं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले. विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाणांनी राजीनामा दिला असून या प्रकरणाचा तपास आता सीआयडी करेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तर दिलं.


दिलीप वळसे पाटील म्हणाले की, "प्रत्येक  केस ही सीबीआयकडे द्या अशी मागणी करणे हे बरोबर नाही. महाराष्ट्रातील पोलीस दलावर तुमचा विश्वास नाही का? मी कुणाची पाठराखण करणार नाही, परंतु हे संपूर्ण प्रकरण आपल्याला तपासावं लागेल. यामागे कोण आहे, कोण दोषी आहे त्याच्यावर काय कारवाई करायची हे पहावं लागेल."


देवेंद्र फडणवीस यांचे आरोप काय?
राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे कार्यालय हे विरोधकांची कत्तल कशी करायची याचं कारस्थान शिजण्याचं मुख्य ठिकाण आहे.त्याच ठिकाणी गिरीश महाजन यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा कट रचल्याचा घणाघाती आरोप करत देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात खळबळ उडवून दिली होती. विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप असलेल्या व्हिडीओचा पेन ड्राइव्ह फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. गिरीश महाजनांच्या विरोधात गुन्हा कसा नोंद करायचा यापासून ते बरंच काही या कार्यालयात ठरलं. एफआयआर नोंद करणे आणि खोटे साक्षीदार तयार करण्याचं काम सरकारी वकिलांनी केलं. साक्षी कशा घ्यायच्या त्यापासून पैसे कसे घ्यायचे याचा सर्व घटनाक्रम या व्हिडीओत असल्याचे त्यांनी म्हटले.


आज दुसरा पेन ड्राईव्ह बॉम्ब
आज विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी नवा पेनड्राईव्ह बॉम्ब सादर केला.यात एक ऑडिओ असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. यातील डॉ. मुद्दस्सिर लांबे यांचे संबंध दाऊदशी असून डॉ. मुद्दस्सिर लांबे आणि अर्शद खान  यांच्यातील संभाषणाचा हा ऑडिओ असल्याचं त्यांनी सांगितलं. डॉ लांबे यांना राज्य सरकारने वक्फ बोर्डवरती घेतले आहे. मात्र एका सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलेने त्यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार केली आहे, असंही फडणवीस म्हणाले.


संबंधित बातम्या: