मुंबई: तुम्ही म्हणजे मुंबई नाही, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, आणि तुम्ही म्हणजे मराठी नाही असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे. आपण मागितलेल्या एकाही प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं नाही असं म्हणत विरोधकांनी सभात्याग केला.
महाराष्ट्रावर टीका केली तर ती सहन केली जाणार नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही आणि तुम्ही म्हणजे मराठी नाही."
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "इतरांचं ठिक आहे, पण नवाब मलिकांचे समर्थन मुख्यमंत्र्यांनी करणे हे मनाला लागलंय, मुख्यमंत्री ठाकरे नवाब मलिकांचे समर्थन कसं काय करु शकतात असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केला आहे."
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. त्यावर उत्तर देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आपण विचारलेल्या एकाही प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं नाही. त्यांचं भाषण हे विधीमंडळातील नसून शिवाजी पार्कवरचं आहे असंच वाटत होतं. नवाब मलिकांनी 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपीकडून जमीन खरेदी केली होती. मग त्यांचं समर्थन कसं काय करणार?"
युक्रेनने मुख्यमंत्र्यांची मदत मागायला हवी होती
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, युक्रेनने नाटोऐवजी मुख्यमंत्र्यांची मदत मागायला हवी होती. त्याचं कारण म्हणजे मुख्यमंत्र्याकडे एक वेगळं शस्त्र आहे. ते म्हणजे 'टोमणा' बॉम्ब.
सत्तेसाठी तुम्ही कोणत्या शकुनीसोबत गेला आहात असा सवाल करताना कपटांनी राज्य हे कौरवांनी घेतलं होतं, पांडवांनी नाही असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: