Maharashtra Budget Session : राज्यात विविध भागात अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) आणि गारपिटीने (Hail Storm) उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा, गहू, हरभरा, सोयाबीन, मका, तूर, केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे, तरी नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सभागृहात केली. 


शेतकरी दुहेरी अडचणीत, पंचनामे करुन नुकसान भरपाई द्या : अजित पवार


विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, "गेल्या दोन दिवसात नाशिक, धुळे, बुलडाणा, पालघर, बीड, जालना, पुणे, अहमदनगर, वाशिम, सोलापूर आणि राज्यातील इतर भागात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा, गहू, हरभरा, सोयाबीन, मका, तूर, केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच कापणीला आलेला गहू जमीनदोस्त झाला आहे, आंबा, काजू, द्राक्षे, केळी, संत्रा,‍ लिंबू, पपई, कलिंगड यासारख्या अनेक फळपीकांबरोबरच हरभरा, तूर, मका, वाल, चवळी, पावटा व इतर रब्बी पालेभाज्या यांचेही नुकसान झालेले आहे. वीज अंगावर पडून जनावरे दगावली आहेत, मेंढ्यासुद्धा मृत झाल्या आहेत. शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात सापडला आहे आंबा, काजू सारख्या पिकांचा मोहोर, व संत्रा लिंबू यांची फळे गळल्याने उत्पादनावर विपरीत परीणाम होणार आहे. शेतकरी दुहेरी अडचणीत सापडल्याने सरकारने या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी."


देवेंद्र फडणवीस यांचं शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन 


अवकाळी पावसामुळे राज्यातील 13 हजार 729 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. राज्यात आठ जिल्ह्यात या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. शेतकरी नुकसानीच्या मुद्यावरुन विरोधक आक्रमक झाले होते. विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना फडणवीसांनी विधीमंडळात ही माहिती दिली. अवकाळी पावसामुळे गहू, ज्वारी, हरभरा, मका, द्राक्ष, आंबा, पपई, संत्रा या पिकांचं नुकसान झाले असून, तात्काळ नुकसानग्रस्त भागाची माहिती शासनाने मागितली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले. तसंच जकारण करु नका, हा शेतकऱ्यांचा विषय आहे. शेतकऱ्यांना मदत करणार आहे, असंही त्यांनी विरोधकांना उद्देशून म्हटलं.


संबंधित बातमी


Devendra Fadnavis : अवकाळीचा तडाखा, आठ जिल्ह्यात 13 हजार 729 हेक्टरवरील पिकांचं नुकसान; फडणवीसांचं शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन