Maharashtra Budget Session 2023 : राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस (Unseasonal rain) झाला आहे. या पावसामुळे शेती पिकांचं (Agriculture Crop) मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी याच मुद्द्यावरुन विरोधकांनी सभागृहात आक्रमक पवित्रा घेतला. शेतकऱ्यांच्या नुकसानीचा मुद्दा गांभीर्यानं घेण्याची गरज असल्याचे मत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केलं. शेतकरी जगला तर राज्य जगेल. त्यानुसार सरकारने काम करावं असे अजित पवार म्हणाले. त्यांच्या या मागणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उत्तर दिलं आहे. 


CM Eknath Shinde : सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही 


सरकारने कांद्याला अतिशय तुटपुंजी मदत केली आहे. त्यामुळे सरकारनं शेतकऱ्यांना वाढीव मदत करावी अशी मागणी अजित पवार यांनी सभागृहात केली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. अवकाळी पावसाच्या संदर्भात मी नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत हे स्वत: नुकसान झालेल्या ठिकाणी गेले आहेत. तिथे पंचनामे सुरु आहेत. तसेच नाशिक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी देखील मी बोललो आहे. तिथेही पंचनामे सुरु असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं. त्याचाही अहवाल ते पाठवत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आतापर्यंत झालेल्या नुकसानीचे पंचनामे जवळपास पूर्ण झाले आहेत. कालपासून काही ठिकाणी पाऊस सुरु आहे, त्याकाणचे देखील पंचनामे सुरु असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. सगळे नियम डावलून शेतकऱ्यांना आपण यापूर्वीही मदत केली आहे. यावेळीही मदत करणार आहोत. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. हे सरकार शेतकऱ्यांचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.


Chandrakant Patil : शेतकऱ्यांना मदत करण्याची सरकारची भूमिका  


अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. याबाबत सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घेतली आहे. याआधीसुद्धा सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात तत्परतेने निर्णय केल्याचे संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले. आपल्याकडे दुष्काळाची भरपाई, अतिवृष्टीची भरपाई देण्यात येते. पण अवकाळी पावसाच्या भरपाई संदर्भात काही केलं नव्हतं. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीलासुद्धा मदत देण्याचा निर्णय घेतल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचे पाटील म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या:


Budget Session 2023 : शेतकरी प्रश्नांवरुन विरोधक आक्रमक, विधीमंडळाच्या पायऱ्यावर सरकारविरोधात घोषणाबाजी