मुंबई: धान उत्पादकांचे थकीत असलेले 600 कोटी तात्काळ देण्यात येतील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. शेतकऱ्याच्या नावाने मिळणारी रक्कम ही शेतकऱ्याच्या हातातच जावी यासाठी बोनसऐवजी शेतकऱ्याला प्रति एकर मदत करता येईल का? याचा राज्यसरकार विचार करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या कामकाजाला आजपासून सुरुवात झाली. शासनाने धान खरेदी सुरु केली आहे, शेतकऱ्यांना आधारभूत किंमत मिळत आहे. मात्र या वर्षीचा बोनस मिळालेला नाही. तो बोनस द्यावा, अशी मागणी शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी सभागृहात केली. याशिवाय भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी 2013 पासून सुरू केलेली बोनस देण्याची पद्धत सुरु ठेवावी अशी मागणी केली.
भाजप नेते मुनगंटीवार यांच्या या मागणीला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना बोनस न देण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला असल्याचं स्पष्ट केलं. बोनसऐवजी शेतकऱ्यांनी जितक्या क्षेत्रावर धान उत्पादन केले, त्यानुसार त्याला मदत करता येते का? याची चाचपणी सुरू केली असल्याचंही त्यांनी सांगितलं.
आजूबाजूच्या राज्यांमध्ये परिस्थिती काय हे तपासणार
मध्यप्रदेश, छत्तीसगढसारख्या आजूबाजूच्या राज्यांमध्ये काय परिस्थिती आहे, हे तपासले जाईल. कारण राज्य सरकारने बोनस जाहीर केल्यानंतर शेजारच्या राज्यातील माल आपल्याकडे येतो आणि ते देखील बोनस मागतात. तसेच राज्यात देखील बोनस वाटताना तो शेतकऱ्यांना न मिळता मधले व्यापारी त्यात घोटाळा करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति एकरी मदत देण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याचे अजित पवार सभागृहात सांगितले.
संबंधित बातम्या :