रत्नागिरी : राज्याचा अर्थसंकल्प आज अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. समाजातील कोणताही घटक असो अथवा राज्यातील कोणताही भौगोलिक विभाग, या सर्वांचं लक्ष होतं ते आपल्याला काय मिळणार? सध्या महाविकास आघाडीसोबत शिवसेना सत्तेत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे कोकणाला त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असणं यात काही गैर नाही. कारण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्याने कोकणाला काय मिळणार? किंवा मिळालं? याकडे सर्वाचं लक्ष होतं. यावेळी कोकणासाठी काही प्रमुख घोषणा झाल्या. कोकणाला नेमकं काय मिळालं? त्याचा फायदा कोकणाला कसा होणार? याबाबत 'एबीपी माझा'ने रत्नागिरीतील अर्थविषयातील जाणकार असलेल्या अॅड. दीपक पटवर्धन यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना पटवर्धन यांनी 'रेवस ते रेड्डी या सागरी महामार्गासाठी केलेल्या आर्थिक तरतुदीकडे सकारात्मकरितीने पाहिलं पाहिजे. त्याचा कोकणाला नक्कीच फायदा होईल. शिवाय, मत्स व्यवसायाबाबत देखील सरकार करत असलेल्या प्रयत्नांबाबत समाधान व्यक्त केलं.


या साऱ्याबाबी कोकणच्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत. पण, रत्नागिरीतील मेडिकल कॉलेजबाबत पटवर्धन यांना विचारले असता त्यावर मात्र त्यांनी नाराजी व्यक्त केली. 'मागील अनेक दिवसांपासून रत्नागिरीतील मेडिकल कॉलेजबाबत चर्चा सुरु होती. रत्नागिरीमधील जागांची देखील पाहणी झाली होती. त्यामुळे रत्नागिरीला मेडिकल कॉलेज मिळेल अशी आशा होती. पण, ती फोल ठरली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक खासगी कॉलेज असताना सरकार कॉलेज त्याठिकाणी का मंजूर करण्यात आलं? उलटपक्षी ते रत्नागिरीला देण्याची गरज होती. शिवाय, कोकणातील रायगड आणि सिंधुदुर्गच्या तुलनेत रत्नागिरी जिल्ह्याला मात्र अपेक्षेप्रमाणे काहीही पदरात पडलं नसल्याची प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली.


कोकणाला काय काय मिळालं? 


1. श्यामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळासाठी 50 कोटी रुपये


2. रायगड येथील रेवस ते सिंधुदुर्ग येथील रेड्डी महामार्गासाठी 9570 कोटींची तरतूद


3. मत्स्य व्यवसायाकरता सरकारने केलेली तरतूद ही नक्कीच सकारात्मक बाब आहे. त्यामुळे कोकणच्या मत्स्य आणि त्यातून होणाऱ्या आर्थिक उलाढालीमध्ये नक्कीच सकारात्मक बदल येत्या काही दिवसात दिसतील.


4. रायगड येथे केंद्रीय आपत्कालीन एनडीआरएफची (NDRF) तुकडी


5. रायगड, सिंधुदुर्गमध्ये वैद्यकीय महाविद्यालय


6. राजापूर येथील धुतपापेश्वर मंदिराचा विकास. याठिकाणी मंदिराचे जतन आणि संवर्धन केले जाणार


7. रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा इथे पथदर्शी तत्वावर कातकरी समाजासाठी एकात्मिक वसाहत


8. रायगड जिल्ह्यातील काशीद येते पर्यटनासाठी जेट्टी विकसित करणार, तर रत्नागिरी येथील भगवती इथे क्रूझ टर्मिनलची उभारणी करणार


9. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांसाठी सिंधुरत्न समृद्ध योजना. दोन्ही जिल्ह्यातील साधनसंपतीचा वापर करत उद्योगाचा विकास आणि त्यासाठी 100 कोटी देण्यात आले आहेत.