मुंबई : कोरोना व्हायरसचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षांसोबतच निकालांवरही झाल्याचं दिसून येत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे निकाल कधी जाहीर होणार याची प्रतिक्षा राज्यातील पालक आणि विद्यार्थांना होती. अशातच 16 जुलै रोजी महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. आता दहावीच्या विद्यार्थांना आपल्या निकालाची प्रतिक्षा आहे. काही दिवसांपूर्वी बोलताना, दहावीच्या निकालाचं काम अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती मुंबई बोर्डाचे सचिव संदीप संगवे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली होती. तसेच, राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील हिंगोलीमध्ये बोलताना 31 जुलैपूर्वी दहावीचा निकाल लागेल, असं सांगितलं होतं. परंतु, अद्याप महाराष्ट्र बोर्डाकडून दहावीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.


साधारणपणे बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आठवडाभरात ते 10 दिवसांमध्ये दहावीचा निकाल बोर्डाकडून जाहीर करण्यात येतो. त्यामुळे बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतरपासूनच दहावीच्या निकालासंदर्भात पालक आणि विद्यार्थांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे.


बारावीचा निकाल 15 ते 20 जुलै तर दहावीचा निकाल 31 जुलैपर्यंत लागणार असल्याचं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले होते. लॉकडाऊनमुळे दहावीचा एक पेपर रद्द झाल्याने पेपर तपासणीची प्रक्रियादेखील लांबली होती. त्यामुळे यंदा दहावी आणि बारावी दोन्ही वर्गाचे निकाल लांबले होते. बारावीचा निकाल 16 जुलै रोजी जाहीर करण्यात आला आहे. परंतु, दहावीचा निकाल कधी लागणार याविषयीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.


साधारणपणे म्हणजे गेल्या वर्षात निकाल लागण्याच्या एक दिवस आधी बोर्डाकडून सर्व संबंधितांना कळवलं जातं. यापूर्वी निकालाची तारीख आधी जाहीर व्हायची, आता मात्र फक्त एक दिवस आधी निकालाची तारीख कळवली जाते. सीबीएसईचा बारावी आणि दहावीच्या निकालात एक दिवसाचं अंतर होतं. देशभरातल्या बहुतेक सर्व राज्यांच्या बोर्डांनी आणि दोन राष्ट्रीय बोर्डांनीही त्यांचे निकाल जाहीर केले आहेत. त्यामुळे आता दहावीचा निकालाच्या तारखा कधी जाहीर होणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


SSC Results 2020 | दहावीचा निकालही लवकरच, निकाल तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात