रत्नागिरी : "उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना बोलायला आता काही नसल्यामुळे ते महाराष्ट्र तोडण्याची भाषा वापरत आहेत. कोण तोडतंय महाराष्ट्र? कशासाठी तोडतील?  महाराष्ट्र ना कधी तुटला, ना कधी तुटणार, ना कोणी कधी तोडण्याची हिंमत करणार. मुंबईपासून संपूर्ण महाराष्ट्र एकसंघ आहे आणि एक संघच राहील. ज्या गोष्टींमध्ये तथ्य नाही अशी वक्तव्य उद्धव ठाकरे सध्या करत आहेत. महाराष्ट्र भक्कमपणे चालवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सक्षम आहेत. परंतु, सत्ता गेल्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम उद्धव ठाकरे करत आहेत. अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली आहे. 


 महाराष्ट्र तोडण्याचा डाव भाजपकडून सुरू असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी आज बुलढाण्याच्या सभेत केली होती. याला चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलंय. उद्धव ठाकरे यांच्या अनेक मुद्द्यांवर बावनकुळे यांनी टीका केलीय. छत्रपती शिवाजी महाराज यांची जगदंबा तलवार लंडनमधून महाराष्ट्रात आणणार असं केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून जाहीर केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यावर टीका केली. "तलवार पेलण्यासाठी जे मनगट लागतं ते मनगट फक्त शिवसैनिक आणि शेतकऱ्यांमध्ये असं उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं. यावर बोलताना  बावनकुळे म्हणाले, "गेले अडीच वर्ष तुमच्याकडे सत्ता होती. त्यावेळी तुमच्या हातातून पेन चालवण्याची सुद्धा ताकद नव्हती. तुम्ही काय तलवार उचलण्याची भाषा करता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात वेळ काढूपणाचं काम केलं. अडीच वर्ष फेसबुक लाईव्ह करत राहिले. हे मुख्यमंत्री असताना प्रायव्हेट सेक्रेटरीला देखील चार चार महिने वेळ मिळत नव्हता. अडीच वर्षाच्या काळात 18 महिने आमदारांनाही भेट दिली नाही. साध्या पत्रावरही सही केली नाही. त्यांच्या मनगटात काय ताकद आहे? जी काय ताकद आहे ती मोदीजींमध्ये आहे. मोदींमध्ये संपूर्ण जगात देशाला विश्वगुरू बनवण्याची ताकद आहे. उद्धव ठाकरे यांच्या हातात जेव्हा होतं तेव्हा त्यांनी काही केलं नाही. मुख्यमंत्री असताना साधा पापड भाजता आला नाही आणि भाजलेला पापड तोडला आला नाही, तुम्ही काय जगदंबा तलवारीची गोष्ट करता? 


"शिंदे गटातील आमदारांना तुम्ही आता रेडे म्हणताय. मात्र ते शिवसेनेत असताना त्यांना तुम्ही तिकीट दिलंय. जनतेने त्यांना आमदार म्हणून निवडून दिले आहे. त्यावेळी ते शिवसैनिक होते आणि आता तुम्ही त्यांना रेडे म्हणताय. तुमच्या हुकूमशाहीला, दडपशाहीला कंटाळून हे लोक गेले आहेत. आमदारांची तुम्ही थट्टा करताय, पुढच्या वेळी तुम्हाला दोन आमदार मिळणं सुद्धा मुश्कील आहे. जे राहिले आहेत ते सुद्धा तुम्हाला सोडून जातील.  तुमच्या अडीच वर्षाच्या काळात महाराष्ट्र मागे गेलाय, असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केला.  


भाजप हा चोर बाजारांचा पक्ष असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली. त्यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, "आम्ही तुमच्यासारखे हुकुमशहा नाही. तुम्हाला 40 आमदार सांभाळता आले नाहीत. तुम्ही आमदार खासदारांसोबत अत्यंत वाईट वागलात. त्यामुळेच तुमच्यासोबत आमदार, खासदार राहत नसून ते आमच्याकडे येत आहेत. महाविकास आघाडीला 2024  मध्ये उमेदवार सुद्धा मिळणार नाही अशी स्थिती होईल. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेच्या दरम्यान भाजपमध्ये दीड हजार कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी सत्तेच्या लोभापाई शिवसेनेची वाट लावली. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची वाट लावली. त्यामुळे उद्धवजी हा इतिहास जमा झालेला विषय असतील.


बावनकुळे यांनी यावेळी राज्यपालांच्या वक्तव्याबाबत देखील आपली भूमिका स्पष्ट केली. "राज्यपालांच्या वक्तव्याचं कुणीही समर्थन केलेलं नाही. आतापर्यंतची 50 उदाहरणं असतील त्यांनी शिवरायांचा मान राखण्याचं काम केलं. पायी शिवनेरीवर सुद्धा ते गेले. एक संदर्भ आला आणि त्या संदर्भातून एक वक्तव्य आलं, त्या वक्तव्याचं समर्थन कोणीच करत नाही. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्र बंद करण्याची भाषा करता. परंतु, महाराष्ट्र बंद करण्याची क्षमता तुमच्यात नाही.  उद्धव ठाकरें जवळ माणसंच राहिली नाहीत, तर ते महाराष्ट्र काय बंद करतील. हे फक्त वल्गना करतात. त्यांच्यासोबत कोणीच नाही. जे आहेत ते फक्त तोंडाच्या वाफा आहेत, अशी टीका बावनकुळे यांनी केली.  


महत्वाच्या बातम्या


Uddhav Thackeray: भाजप हा पक्ष आहे की चोरबाजार, उद्धव ठाकरेंचं चिखलीत टीकास्त्र